देशातील १० टक्के श्रीमंतांकडेच आहे अर्ध्याहून अधिक संपत्ती, चक्रावणारी माहिती जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:44 PM2021-09-15T17:44:16+5:302021-09-15T17:48:41+5:30

देशातील श्रीमंत व्यक्तींच्या मालकीच्या मालमत्ता आणि श्रीमंतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. जाणून घ्या....

देशातील १० टक्के श्रीमंतांकडेच देशातील अर्ध्याहून अधिक संपत्ती असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

देशातील ५० टक्के जनतेकडे संपत्तीचा केवळ १० टक्के हिस्सा आहे. नुकतंच सरकारकडून सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे २०१९ च्या माहितीनुसार देशातील १० टक्के श्रीमंत वर्गाकडेच शहरी भागातील ५५.७ टक्के संपत्ती आहे. तर ग्रामीण भागात ५०.८ टक्के इतकी संपत्ती श्रीमंतांच्या मालकीची आहे.

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या या सर्व्हेत संपत्तीचं विवरण हे त्यांच्या वित्तीय आधारावर करण्यात आलं आहे. यातूनच कोणत्या कुटुंबाकडे किती संपत्ती आहे याची गणना करण्यात आली आहे. यात स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे.

इमारती, प्राणी आणि वाहनं यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांमधले शेअर्स, बँक-पोस्टातील गुंतवणूक इत्यादींचाही समावेश करण्यात आला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांकडे २७४ लाख कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. यात जवळपास १४० लाख कोटींची संपत्ती केवळ १० टक्के श्रीमंतांच्या मालकीची असल्याचं दिसून आलं आहे.

ग्रामीण भागातील ५० टक्के गरीबांकडे एकूण संपत्तीपैकी केवळ १० टक्के हिस्सा असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर शहरी भागात ५० टक्के जनतेकडे एकूण संपत्तीपैकी केवळ ६.२ टक्के हिस्सा आहे.

पंजाबमध्ये तर १० टक्के श्रीमंत वर्गाकडे राज्यातील ६५ टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे. तर ५० टक्के जनतेचा एकूण संपत्तीतील वाटा केवळ ५ टक्के इतका आहे.