साप्ताहिक राशीभविष्य: 'या' सहा राशींसाठी आठवडा शुभदायी; लग्न, धनलाभाच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:23 AM2024-06-23T10:23:42+5:302024-06-23T10:44:32+5:30

Weekly Horoscope: २३ जून २०२४ ते २९ जून २०२४ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात दि. २९ रोजी बुध कर्क राशीत जाईल. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- मंगळ मेषेत, गुरू आणि हर्षल वृषभेत, रवी, शुक्र आणि बुध मिथुन राशीत, शनिवारी बुध मिथुनेतून कर्क राशीत जाईल. केतू कन्येत, प्लूटो मकरेत. शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील. दि. २५ रोजी अंगारकी चतुर्थी, तर दि. २८ रोजी कालाष्टमी आहे. मंगळवारी उत्तर रात्री १:४९ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुकवार आणि शनिवारी पूर्ण काळ पंचक राहील.

रविवार, दि. २३ जून २०२४ रोजी ज्येष्ठ कृष्ण द्वितीया (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ३:२६ पर्यंत) आहे. सायंकाळी ५:०४ पर्यंत पूर्वाषाढा तर त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र राहील. रात्री १०:४८ पर्यंत धनू, तर त्यानंतर मकर रास राहील. दिवस चांगला आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील. (राहू काळात महत्वाची कामे टाळा.)

मेष - अडचणी दूर होतील : व्यवसायात स्पर्धकांना मागे टाकाल. तुमच्या कामगिरीचा प्रभाव पडेल. हाती पैसा खेळता राहील, मालाची विक्री चांगली होईल. नातेवाइकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. पर्यटन व मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीतील बदल तुमच्या फायद्याचे ठरतील. मित्र- मैत्रिणींच्या भेटी होतील. प्रलंबित कागदोपत्री पूर्तता होईल. सप्ताहाच्या शेवटी मात्र थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. टीप: रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

वृषभ - प्रगती होईल : सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. मात्र, लगेचच त्यातून मार्ग निघेल आणि तुमच्या प्रगतीचा रथ वेगाने धावू लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आरोग्याच्या समस्या सुटतील. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत कामाचा थोडा ताण राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. मात्र, देवाणघेवाणीचे व्यवहार जपून करणेच योग्य राहील. टीप: सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मिथुन- लाभ होतील : दूरच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. चांगल्या संधी मिळतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. नोकरीत नवीन प्रस्ताव तुमच्या समोर मांडला जाईल. त्यातील बारकावे समजून घ्या आणि नंतरच निर्णय घ्या. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण कराल. टीप : रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कर्क -संमिश्र ग्रहमान : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव या सप्ताहात आपल्याला येईल. सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. नोकरीत स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील कामांसाठी वेळ देणे जमणार नाही. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, जीवनसाथीची चांगली साथ राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात सतर्क राहा. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. तुमची माहिती लोकांना सांगू नका. अचानक दूरचे पाहुणे घरी येतील. टीप: सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

सिंह- कटू गोड अनुभव: काही कटू अनुभव येतील. मात्र एकंदरीत अनुकूलता जास्त राहील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मात्र त्यांच्याशी संवाद साधा. चांगल्या बातम्या कानावर पडतील. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात परिश्रमाचा योग्य फायदा होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील. टीप : रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कन्या- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. कामाचे स्वरूप बदलेल. नवीन संधीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघा. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरी पाहणे मंडळी येतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. फार दगदग होईल, अशी कामे उत्तरार्धात करू नका. तुमच्या योजनांची माहिती इतरांना सांगू नका. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमात फसवणूक होऊ शकते. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ- व्यवसाय आणि नोकरीत अनुकूल वातावरण राहील, व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्रक मिळू शकते. आर्थिक लाभही होतील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल, नवीन ओळखी होतील. जीवनसाथीचा सल्ला शांतपणे ऐकून घ्या. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. सावध राहा. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

वृश्चिक- सफलता मिळेल: सप्ताहात आपल्याला अनेक आघाड्यांवर अनुकूल परिणाम दिसून येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मात्र, गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. नातेवाइकांच्या भेटी होतील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. मुलांना नवीन संधी मिळतील. त्यांच्याशी संवाद साधा. मनात सकारात्मक विचार राहतील. अचानक दूरचा प्रवास करावा लागेल. टीप : रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

धनू- प्रेमात सफलता मिळेल : मनात सकारात्मक विचार राहतील, ठरवलेल्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी कराल. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल वातावरण राहील. चांगली स्थळे चालून येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे सावधपणे पावले उचलली पाहिजेत. नोकरीत नवीन कामाचा ताण राहील. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

मकर- जीवनसाथीचा सल्ला घ्या : एखाद्या नवीन व्यवसायाची माहिती कळेल. मात्र, आपण विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. वरवर दिलेल्या माहितीवर विसंबून राहता कामा नये. मनात आध्यात्मिक विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, प्रयत्नशील राहावे लागेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. टीप: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कुंभ- पुरस्कार मिळतील : सप्ताहाच्या सुरुवातीला चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाही तर पैसा मिळूनही हात रिकामाच राहील, तसेच कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. कायद्याची बंधने पाळा. काहींना पुरस्कार मिळतील. परीक्षा देणाऱ्यांना अनुकूल काळ आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी संवाद ठेवा. त्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. टीप : रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मीन - नवीन संधी मिळेल : कार्यक्षेत्र गाजवाल. नवीन संधी मिळेल. त्या संधीचे तुम्ही सोने कराल. पगारवाढ, पदोन्नती, सोयी- सुविधा अशा प्रकारचे लाभ होतील. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने घरी पाहुणे मंडळी येतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. पैशाचा ओघ सुरू राहील. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्साहाच्या भरात कायदा मोडला जाणार नाही, याची काळजी घ्या. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)