Vastu Tips: पाणीशुद्धीसाठी वापरली जाणारी 'तुरटी' करेल तुमची वास्तु आणि ग्रहशुद्धी; कशी ते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:40 IST2025-02-17T17:25:55+5:302025-02-17T17:40:24+5:30
Vastu Tips: वॉटर प्युरिफायर आता घरोघरी आले, मात्र पूर्वी पाणी शुद्धीकरणासाठी तुरटीचा स्वस्त आणि मस्त उपाय केला जात असे. तुरट रंगाची तुरटी, जिला हिंदीत फिटकरी असेही म्हटले जाते, तिचा वापर करून आपल्याला वास्तू दोष, कुंडली दोष, कर्जमुक्ती तसेच धनवृद्धी करता येते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. हे उपाय नेमके कसे करावेत ते पाहू.

तुरटी जशी पाण्यामध्ये फिरवली असता सगळा गाळ पाण्याच्या तळाशी जातो, त्याचप्रमाणे तुरटीचा वापर करून अनेक प्रकारचे लाभ मिळवता येतात. कारण तुरटीमध्ये नकारात्मकता दूर करण्याची अफाट शक्ती आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात यावी, सुख संपत्ती नांदावी यासाठी दिलेले उपाय करून बघा, लाभ होईल.

धनलाभ :
तुरटीमध्ये काही गुणधर्म आहेत जे पैसे आकर्षित करतात आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात. त्यामुळे तुरटी तिजोरीत ठेवल्याने पैशाचे रक्षण होते. तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, व्यक्ती सकारात्मक उर्जेने भरते. छोट्याशा काळ्या कापडात बांधलेली तुरटी घराच्या तसेच दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधली असता संरक्षण कवच म्हणून काम करते. त्यामुळे धनवृद्धीस मदत होते.

कर्जमुक्ती :
विड्याच्या पानात तुरटी गुंडाळून पिंपळाच्या झाडाजवळ ती पुरचुंडी ठेवावी. आपले कर्ज दूर व्हावे अशी प्रार्थना करावी. सलग तीन बुधवार हा उपाय केला असता कर्जमुक्ती होण्यास मदत मिळते, अर्थात उत्पन्नाचे साधन वाढते. कर्जमुक्तीच्या वाटा सापडतात आणि आयुष्य आनंदमयी होते.

वादविवादातून मुक्ती :
घरात शांतता राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुरटीचा वापर! एका भांड्यात पाणी भरून त्यात तुरटीचा खडा टाका. ते पाणी झोपताना आपल्या पलंगाखाली ठेवा, दुसऱ्या दिवशी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेले पाणी पिंपळाच्या झाडाला टाकून या. हा उपाय सलग काही दिवस केला असता, घरातले वादविवाद मिटून मन:शांती मिळते, नातेसंबंध सुधारतात.

नकारात्मक ऊर्जा :
बाथरूममध्ये फ्रेशनर ठेवतो तसेच एका वाटीत तुरटीचा खडा ठेवा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्या तुरटीकडे आकर्षिक होईल आणि सकारात्मकता निर्माण होईल. घरात बदल जानवेपर्यंत हा उपाय सातत्याने करा.

वास्तू दोष :
बाथरूमप्रमाणे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुरटीचा छोटा छोटा खडा टाकल्यामुळेही घराच्या कानाकोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हर प्रकारचे वास्तू दोष दूर होण्यास मदत होते.

















