Vastu Shastra: तुमच्या किचन विंडोमध्ये तुळस लावलीय का? ताबडतोब वास्तुनियम वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:05 PM2024-06-19T16:05:33+5:302024-06-19T16:10:26+5:30

Vastu Tips: घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक रोपं, फुलझाडं लावली जातात. पण वास्तुशास्त्रात घरामध्ये कोणती रोपं लावावी, यासंदर्भात काही नियम सांगितले आहेत, त्यानुसार रोपांची लागवड केल्यास घरात सुख-शांतीचे वातावरण राहील.

घराच्या अंगणात, खिडकीत, दारात आपण वेगवेगळी रोपं ठेवतोच, पण काही जणांना स्वयंपाकघरातही विविध प्रकारची रोपं ठेवायला आवडतात. त्यात काही जण तुळशीचाही समावेश करतात. पण तसे करणे वास्तुशास्त्राला धरून आहे की नाही ते जाणून घेऊ.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व दिले जाते. हे पवित्र तसेच पूजनीय मानले जाते. अशा परिस्थितीत, तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आढळते आणि सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा देखील केली जाते. पण म्हणून ते स्वयंपाक घरात ठेवावे की नाही, याबाबत वास्तू शास्त्राचे नियम जाणून घेऊ.

तुळस ही पवित्र मानली जाते तसेच ती वातावरण शुद्धी देखील करते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. त्याचबरोबर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावले तर तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात. माता अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या वास्तूला लाभतो.

स्वयंपाकघराची खिडकी उत्तर दिशेला असेल आणि तिथे तुळशीचे रोप ठेवले असेल तर त्याचे त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात. दररोज स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तुळशीची पूजा करावी. रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करणे टाळावे. यासोबतच या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत.

जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवत असाल तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळणार नाहीत. तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठेवू नका. याशिवाय तुळशीजवळ खरकटी भांडीही ठेवू नका. या चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावता, तसा तुळशीजवळही दिवा लावा. त्यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहील आणि किचन जवळील तुळशीला दिवा लावल्याने अन्न-धान्याची कधीही उणीव भासणार नाही.