वास्तुशास्त्र तसेच फेंगशुई शास्त्राने सुचवलेली 'ही' दहा झाडं तुमचे नशीब बदलून टाकतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:33 IST2021-11-23T13:16:07+5:302021-11-23T13:33:23+5:30
झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो. पण हीच झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालणारे ठरणार असेल तर? यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात झाडांना अतिशय महत्त्व आहे. चला तर आपणही जाणून घेऊया, अशी कोणती झाडं आपल्या घरात लावल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि आपले आरोग्यही सुधारेल आणि घरात आनंदाचा वर्षावदेखील होईल...

१) मनी प्लॅन्ट
फेंगशुई शास्त्रात बांबूच्या बोन्साय झाडाला मनी प्लॅन्ट असे संबोधले गेले आहे. कारण हे झाड लावले असता घराची आर्थिक स्थिती वेगाने सुधारते असा तिथला अनुभव आहे. मनी प्लॅन्ट कोणाला भेटवस्तू म्हणून देणे हे त्यांसाठी धन वृद्धीचे कारण ठरते. असे म्हणतात, की तीन मजली मनी प्लॅन्ट अधिक लाभदायक ठरते. त्याला लाल रिबीन बांधून घरातल्या उजेडाच्या जागी ठेवावे. त्याला प्रखर सूर्यप्रकाशात ठेवू नये. त्याला कीड लागल्यास तेवढा भाग काढून टाकावा. दर आठवड्याला त्याचे पाणी बदलावे. हे झाड वरच्या दिशेने पटापट वाढते म्हणून त्याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

२. पोथोज (मनी प्लॅन्ट) :
मनी प्लॅन्ट चे वेगवेगवळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पैकी पोथोज नावाचे विदेशी झाड देखील मनी प्लॅन्ट म्हणून गणले जाते. ते तुम्ही मातीच्या कुंडीत किंवा पाण्यातही लावू शकता. ते पाण्यात लावणे विशेष लाभदायक ठरते. ही एक वेल असल्यामुळे ती वरच्या दिशेने वाढणे शुभ समजले जाते. यासाठी हे झाड घराच्या आग्नेय दिशेला उजेडात लावावे. परंतु थेट सूर्यप्रकाश टाळावा. वेलीला वरच्या दिशेने वाढण्यासाठी आधार द्यावा. वेलीचे जमिनीच्या दिशेने घरंगळणे वास्तू दोषाला निमंत्रण ठरते. हे झाड जेवढे टवटवीत तेवढा घराचा विकास वेगाने होतो. यासाठीच त्याची जुनी, पिवळी पडलेली किंवा कीड लागलेली पानं वेळीच खुडून टाकावीत.

३. तुळस :
आयुर्वेद आणि अध्यात्म यांच्यादृष्टीने तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे रोप आढळतेच. त्याचे सकारात्मक परिणामही आपण अनुभवतो. आग्नेय दिशेने लावलेले तुळशीचे रोप जास्त लाभदायक मानले जाते. तसे शक्य नसेल तर उत्तर पूर्व जागादेखील तुळशीसाठी पोषक ठरेल. तुळशीला फार पाणी सोसवत नाही. अन्यथा ते रोपटे खराब होते. पुरेसा सूर्यप्रकाश, चांगली माती आणि थोडेफार पाणी यावर तुळशी छान फोफावते. ज्या घरात तुळशीचे रोप डवरते, त्या घरात नेहमी मांगल्य नांदते.

४. स्नेक प्लॅन्ट :
हे देखील विदेशी रोपटे असून त्याची पाने लांबसडक, हिरवी गार आणि वरच्या बाजूने वाढणारी असतात. त्याला फार मशागत करावी लागत नाही. पुरेसा उजेड, थोडेसे पाणी आणि चांगली माती मिळाली की हे रोपटे छान वाढते. या रोपासाठी वास्तुशास्त्रानुसार घराची आग्नेय बाजू उत्तम मानली जाते.

५. कोरफड :
घराघरात सहज आढळणारे रोपटे असते कोरफडीचे. दिसायला रुक्ष तरी मोठ्या प्रमाणात उगवणारी ही वनस्पती अतिशय गुणकारी असते. सौंदर्य प्रसाधन, आयुर्वेद तसेच वातावरण शुद्धीसाठी तिची लागवड केली जाते. कोरफडीचा भरपूर प्रमाणात गर असल्याने त्याला फार पाणी घालावे लागत नाही. पुरेशा सूर्यप्रकाशात हे रोपटे मातीत रुजवल्यावर दर एक दोन आठवड्यांनी माती ओली होईल एवढेच पाणी टाकावे.

६. जेड प्लॅन्ट :
या रोपाला लकी प्लॅन्ट असेही म्हणतात. फेंगशुई नुसार हे रोपटे पैशांना चुंबकासारखे आकर्षून घेते. धनवृद्धी करते. ते पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे उत्तम ठरते. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी हे रोपटे आवर्जून ठेवावे. त्याचा अवश्य लाभ होतो.

७. केळीचे झाड :
भारतात केळीच्या झाडाला सर्वतोपरी महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या केळीचे झाड अंगणात असणे म्हणजे साक्षात विष्णूंचे वास्तव्य आपल्या दारी असण्यासारखे आहे. आपल्याकडे मोठी बाग नसली तरी केळीचे बोन्साय झाड तुम्ही आपल्या घरात पूर्व किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात लावू शकता. ज्या वास्तूमध्ये केळीचे झाड असते तिथे कोणत्याही गोष्टीची उणीव कधीच भासत नाही. तुमच्याही घरात केळीचे झाड असेल तर त्याचा परिसर कायम स्वच्छ ठेवा आणि दर गुरुवारी सायंकाळी त्या झाडाशी दिवा लावायला विसरू नका.

८. झेंडू :
वास्तुशास्त्रानुसार झेंडूचे रोपटे अतिशय सकारात्मक ऊर्जा आणते. त्याला थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये, उन्हाळयात ते सावलीत ठेवले तरी चालेल. मात्र त्यावर कडक सूर्यप्रकाश पडू देऊ नये. झेंडूंच्या फुलांमध्ये वातावरणात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता असते म्हणून हे रोपटे आवर्जून आपल्या अंगणात लावावे.

९. रबराचे झाड :
वास्तुशास्त्रानुसार रबराचे झाड अतिशय महत्त्वाचे आहे. ते आर्थिक वृद्धीसाठी कारणीभूत ठरते. या रोपामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. या रोपाची विशेष मशागत देखील करावी लागत नाही. हेदेखील इनडोअर प्लँट अर्थात घरातल्या पुरेशा उजेडात वाढणारे झाड आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्याची पाने वाळतात त्यामुळे ते झाड घरात उत्तर पूर्व दिशेला ठेवणे उचित ठरते.

१०. कोब्रा प्लॅन्ट :
हे झाड पीस लिली या नावानेही ओळखले जाते. हे झाड घरात सुख, समृद्धी आणि शांतता आणते. त्यामुळे या फुलांचे रोपटे आपल्या शयन गृहात अर्थात बेडरूमच्या खिडकीत ठेवावे असे वास्तू तज्ञ सुचवतात. पुरेशा सूर्यप्रकाशात त्याची छान वाढ होते. त्याची आकर्षक फुले आपल्या मनातील नकारात्मकता दूर करतात आणि मन शांत ठेवण्यास मदत करतात.

















