Navratri 2021: नवरात्रोत्सवात ‘या’ देवींचे स्वप्नात दर्शन झाले? पाहा, मान्यता आणि त्यामागील नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:14 PM2021-10-11T19:14:35+5:302021-10-11T19:18:34+5:30

Navratri 2021: नवरात्र कालावधीत देवीचे दर्शन झाले, तर यामागे नेमका काय अर्थ असू शकतो, ते जाणून घेऊया...

मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जातात. आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी स्वप्नात दिसत असतात. काही स्वप्नांमुळे आपण सुखावून जातो, तर काही स्वप्ने चिंतेत टाकणारी असतात. अनेकदा तंद्री भंगली की, आपण स्वप्नात काय पाहात होतो, याचे स्मरण आपल्याला होत नाही. तर काही स्वप्न अनेक दिवस लक्षात राहणारी असतात.

आपल्याला कोणते स्वप्न पडेल, याचा काही नेम नसतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे मानले जाते. अनेक पुराण कथांमध्ये भगवंताने भक्ताला स्वप्नात दृष्टांत दिल्याच्या कथा आपण वाचतो. ज्योतिषशास्त्रातील स्वप्नशास्त्र शाखेच्या माध्यमातून आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो, याचा अंदाज बांधला जातो.

सन २०२१ मध्ये ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. चातुर्मासात विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकरी आणि क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध नऊ रुपे धारण केली. आदिशक्तीच्या याच नऊ रुपांचे पूजन नवरात्रात केले जाते.

अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात. देशभरात नवरात्र साजरे करण्यामागेही विविधता असल्याचे आढळून येते. याच नवरात्र कालावधीत देवीचे दर्शन झाले, तर यामागे नेमका काय अर्थ असू शकतो, ते जाणून घेऊया...

नवरात्र कालावधीत लक्ष्मी देवीचे दर्शन होणे अत्यंत शुभलाभदायक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीचे स्वप्नात दर्शन होणे याचा अर्थ लवकरच आपल्या आर्थिक समस्यातून काही ना काही दिलासा मिळू शकेल. तसेच व्यापार, व्यवसाय, उद्योगात नफा मिळण्याचेही हे संकेत मानले जातात.

नवरात्रोत्सवात पार्वती देवीचे दर्शन होणे शुभ आणि फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जाते. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळू शकते. तसेच करिअरमध्ये यश व प्रगती होऊ शकते. व्यापार, व्यवसाय, उद्योगात शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक आघाडीवर लाभ मिळू शकतो, असे म्हटले जाते.

नवरात्रीच्या कालावधीत लाल वस्त्र परिधान केलेल्या दुर्गा देवीचे दर्शन झाले, तर तो शुभ संकेत मानला जातो. नजीकच्या काळात आयुष्यात काहीतरी नवे, चांगले घडून येऊ शकते. शुभवार्ता मिळू शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात निश्चित केलेले लक्ष्य प्राप्त होऊ शकते. मुलांकडून सुख, समाधान प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.

नवरात्रोत्सव कालावधीत वाघारूढ दुर्गा देवीचे स्वप्नात दर्शन झाले, तर तो सकारात्मक संकेत असून, देवीचे शुभाशीर्वाद आपल्याला लाभू शकतात. आयुष्यातील समस्या, अडचणी यांमध्ये दिलासा मिळू शकेल. तसेच यश व प्रगतीची कवाडे खुली होणार असल्याचे ते शुभसंकेत असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, या नवरात्र कालावधीत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या दुर्गा देवीचे दर्शन झाले, तर ती धोक्याची घंटा मानली जाते. आगामी कालावधीत आपल्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा संकेत गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला दिला जातो. व्यवहार करताना काळजी घ्यावी, असेही सांगितले जाते.

नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते. देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांचे पठण केले जाते.