दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:03 IST2025-08-06T10:52:39+5:302025-08-06T11:03:21+5:30
Second Shravan Guruwar 2025 Swami Seva: दुसऱ्या श्रावणी गुरुवारी बाकी काही जमले नाही, तरी केवळ १० मिनिटे स्वामींची सेवा अवश्य करावी, असे सांगितले जात आहे.

Second Shravan Guruwar 2025 Swami Seva: मराठी वर्षातील महत्त्वाचा चातुर्मास काळ आहे. चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील दुसरा गुरुवार ०७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. गुरुवार हा दत्तगुरू, स्वामी समर्थ आणि सद्गुरू पूजनासाठी विशेष मानला जातो. गुरुवारी सद्गुरूंचे विशेष पूजन केले जाते.
गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा, सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्रांचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा, असे वाटत असते. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात असूनही मनासारखी स्वामी सेवा करणे शक्य होत नाही.
असे असले तरी श्रावणातील गुरुवारी केवळ १० मिनिटे आवर्जून काढा आणि छोट्या प्रमाणात का होईना, स्वामी सेवा करा. आपण केलेली छोटी सेवा कायमची रुजू होऊ शकेल. हम गया नही जिंदा हैं... या स्वामी वचनाची प्रचिती क्षणोक्षणी येऊ शकेल. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
सकाळी दररोजची पूजा झाल्यावर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. दिवा लावा. उदबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा. या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होईल.
त्यानंतर 'श्री स्वामी समर्थ' हा नामजप १०८ प्रमाणे ११ वेळा जपमाळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा.
स्वामींचा अत्यंत प्रभावी मानला गेलेला तारक मंत्र अवश्य म्हणावा. शक्य असेल तर, ११ वेळा, २१ वेळा म्हणावा. ही सेवा करताना स्वामींसमोर एका भांड्यात पाणी ठेवा आणि सेवा करून झाली की, स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातील सर्वांना तीर्थ म्हणून द्या.
गुरुवार असल्याने स्वामींना आवर्जून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. पिवळ्या रंगाची मिठाई, पेढे अर्पण करा. पिवळ्या वस्त्रांचे दान करा. शक्य असेल तर स्वामींच्या मठात जाऊन स्वामी दर्शन घ्या.
सकाळी स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही, तर तिन्हीसांजेला दिवे लागणीवेळी स्वामींची सेवा करा. स्वामींसमोर दिवा लावा. 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा यथाशक्ती जप करा. स्वामींचा तारक मंत्र म्हणा. स्वामींची मनोभावे सेवा करा आणि मनापासून नमस्कार करा.
अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निःशंक व्हा आणि निर्भय व्हा! स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका.
स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. मी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥, ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥