Sawan 2021: श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:46 PM2021-08-15T20:46:11+5:302021-08-15T20:52:04+5:30

Sawan 2021: गणपती बाप्पाला दूर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते.

संपूर्ण मराठी वर्षात चातुर्मासाला सर्वाधिक महत्त्व आहे. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. ऋतुचक्रात श्रावण महिन्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ते आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्याही प्राप्त झाले आहे. (sharavan durva ashtami 2021)

श्रावणाला व्रत-वैकल्यांचा आणि उत्सवांचा महिना मानले गेले आहे. ही व्रत-वैकल्ये आणि परंपरा या निसर्ग, आरोग्य आणि व्यवहारिकतेला धरून आहेत. श्रावणातील प्रत्येक दिवसाला जसे विशिष्ट महत्त्व आहे, तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांना, व्रतांनाही आहे. (durvashtami vrat 2021)

श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपदात गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गणपती बाप्पाला दूर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते. अनेक भागात दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते.

यंदा श्रावणातील दूर्वाष्टमी व्रत १६ ऑगस्ट २०२१ रोजी आचरले जाईल. याच दिवशी दुर्गाष्टमी आणि श्रावणी सोमवार आहे. श्रावण शुद्ध अष्टमी रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवार, १६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी संपेल. भारतीय पंचागानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे सोमवार, १६ ऑगस्ट रोजी दूर्वाष्टमीचे व्रत आचरावे, असे सांगितले जात आहे. (sharavan durva ashtami 2021 date)

श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतुकालोद्भव फुले, फळे वाहावीत. धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. आरती करावी. (durvashtami vrat puja vidhi)

पूजेच्या शेवटी 'त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।।' हा श्लोक म्हणावा. दूर्वाष्टमीचे व्रत करण्यापूर्वी श्रावण शुद्ध सप्तमीला उपवास करावा. अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी.

शेवटी खोबरे, खजूर यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. स्वत: व्रतकर्त्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबातील सदस्य, आप्तेष्टमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना द्यावे.

दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. (significance of sharavan durva ashtami)

माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे. (durvashtami vrat katha)

दूर्वांच्या कथेनुसार, अमृतासाठी देव आणि दानव एकत्रितपणे समुद्राचे मंथन करीत होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी मंदार पर्वताला पाठीवर उचलून धरले होते. रवीसारखा हा मंदार पर्वत गरगर फिरू लागल्यावर त्याच्या घर्षणामुळे भगवान विष्णूंच्या मानेवरील केस झडून ते समुद्रात पडले. समुद्राच्या लाटांबरोबर ते केस किनाऱ्यावर येऊन आले.

त्या केसांच्याच दूर्वा बनल्या. समुद्र मंथनामधून जे अमृत निघाले, ते ज्या कुंभात भरले होते, तो कुंभ या दूर्वांच्या आसनावर ठेवला गेला. समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दूर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले.

त्यामुळे अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला, अशी कथा पुराणांमध्ये आढळते. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दूर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे, असे सांगितले जाते. दूर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात, असे आग्रहाने सांगितले जाते.