नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:20 IST2025-12-19T13:13:31+5:302025-12-19T13:20:31+5:30

New Year 2026 Astro Tips: २०२५ वर्ष सरत आले असून २०२६ चे वेध सर्वांना लागले आहेत. नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणे नव्हे, तर आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी असते. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या(New Year 2026 Astro Tips) सुरुवातीला केलेले काही साधे पण शास्त्रोक्त उपाय तुमच्या संपूर्ण वर्षाचे भाग्य उजळवू शकतात.

२०२६ मध्ये तुम्हाला सुख, समृद्धी, करिअर-व्यवसायात यश मिळवायचे असेल आणि आयुष्यातली नकारात्मकता दूर करून यश, पैसा आणि उत्तम आरोग्य मिळवायचे असेल तर खालील ९ प्रभावी उपाय नक्की करून पहा.

नवीन वर्षात ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय लावा, तसे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठा. लवकर अंघोळ करण्याची सवय लावून घ्या. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाका. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन दिवसभर प्रसन्नता राहते.

नवीन वर्ष २०२६ हे सूर्याचे वर्ष मानले जाते. कारण २०२६ या अंकाची बेरीज १ येते त्यामुळे या वर्षांचा मूलांक १ आहे. १ हा नक्षत्र मालेतील पहिला ग्रह सूर्य याचे प्रतीक आहे. त्यामुळे २०२६ मध्ये सूर्याचे वर्चस्व राहणार आहे. म्हणून या वर्षात सूर्य उपासनेला महत्त्व द्या. रोज सकाळी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्य नमस्कार करा. त्यामुळे तेज, आरोग्य आणि समाजात मान-सन्मान वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल.

तुमच्या घरातील कपाट किंवा तिजोरी जिथे तुम्ही धन ठेवता, ती जागा स्वच्छ ठेवा. तिथे स्वस्तिक काढा. वर्षाच्या पहिल्या दिवशी तिथे काहीतरी नवीन नाणे किंवा नोट ठेवा, ज्यामुळे वर्षभर धनाची कमतरता भासणार नाही.

घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान आहे. नवीन वर्षात दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावा. दाराबाहेर सुंदर रांगोळी काढून लक्ष्मीचे स्वागत करा. वर्षांची मंगलमयी सुरुवात तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला गरीब किंवा गरजूंना अन्न, वस्त्र किंवा उबदार कपड्यांचे दान करा. ज्योतिषानुसार, दानामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि घरात सुख-शांती येते. याबरोबरच सत्पात्री दान करा. सत्पात्री अर्थात अशी व्यक्ती, जी खरोखरच गरजू आहे, तिची गरज ओळखून यथाशक्ती दान करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तेव्हा नियती तुमच्याही गरजा पूर्ण करते याची खात्री बाळगा.

तुळशीचे रोप हे भाग्याचे प्रतीक आहे. वर्षाच्या पहिल्या संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि कौटुंबिक सौख्य वाढते. हा उपक्रम रोज न चुकता सुरू ठेवा. तुळशीची पूजा ही विष्णू आणि लक्ष्मीचीही पूजा मानली जाते. त्यामुळे सुख-सौख्य घरात नांदते.

वर्षाची सुरुवात शांत मनाने करा. सकाळी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि कामात लक्ष केंद्रित होते. मेडिटेशन हा तुमच्या गतिमान आयुष्याचा एक भाग बनवा. मन शांत असेल तर इतर कामात गती मिळेल. मन एकाग्र करण्यासाठी तुमच्या उपास्य देवतेचा जप करा.

उत्तम आरोग्यासाठी नवीन वर्षात सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. तसेच, आठवड्यातून किमान एक दिवस उपवास किंवा हलका आहार घेण्याचा संकल्प करा, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होईल. महिन्यातून दोन वेळा येणारा एकादशी उपासही करू शकता. मात्र एकादशीला केवळ फलाहार करा, उपासाचे पदार्थ खाऊन उपयोग होणार नाही.

नशिबाची साथ मिळवण्यासाठी पक्षांना धान्य आणि गाईला हिरवा चारा किंवा गुळ-पोळी खाऊ द्या. हे छोटेसे कार्य तुमच्या आयुष्यातील मोठे अडथळे दूर करण्यास मदत करते. पशु सेवा केल्यामुळे त्यांच्या रूपातील पितर तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात.

एव्हाना तुमची संकल्पाची यादी तयार झाली असेलच, त्यात या सोप्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या गोष्टी समाविष्ट करा. आणि हा संकल्प मधूनच सोडून न देता वर्षभर सुरु ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वर्षाखेर संकल्पपूर्तीचा आनंद आणि आयुष्यात सुख, सौख्य, संपत्ती, समाधान प्राप्तीचा आनंद मिळू शकेल.