Maha Kumbh 2025: नागा साधूंना का दिला जातो पहिल्या शाही स्नानाचा मान? सोबत केली जाते साग्रसंगीत तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:25 IST2025-01-14T15:21:20+5:302025-01-14T15:25:02+5:30
Maha Kumbh 2025: शाहीस्नानाची तारीख सूर्य आणि गुरु या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. हे ग्रह राजेशाही ग्रह मानले जातात. असे मानले जाते की हे ग्रह धन, समृद्धी आणि आनंद देतात. या ग्रहांची कृपा झाली असता व्यक्ती उत्कृष्ट जीवन जगते. म्हणूनच या ग्रहांच्या एकत्रित योगावर आयोजित केलेला कुंभमेळा आणि त्या मुहूर्तावर केलेले स्नान शाही स्नान म्हटले जाते, ज्यांचा संबंध अनेक पौराणिक कथांशीदेखील आहे. ज्यामुळे नागा साधूंना त्यात स्नानाची पहिली संधी मिळते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

१३ जानेवारी २०२५ पासून महाकुंभ मेळा(Mahakumbh Mela 2025) सुरू झाला आहे. प्रयागराजमध्ये आयोजित केलेला महाकुंभ २६ फेब्रुवारीला संपणार आहे. या कुंभमेळ्यात कुंभस्नानासाठी भाविक लाखोंच्या संख्येने जमतात, स्नान करतात. कारण या पर्वात तिथे केलेले स्नान मोक्ष मार्गावर नेणारे ठरते अशी श्रद्धा आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका व्हावी यासाठी कुंभस्नान केले जाते. त्यातही काही ठराविक दिवशी केलेले स्नान अत्युच्च योगावर केलेले शाही स्नान ठरते. ज्यात नागा साधूंना स्नान करण्याचा पहिला मान असतो.
शाही स्नान म्हणजे काय?
शाही स्नानाशी संबंधित अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. एका धार्मिक मान्यतेनुसार सूर्य आणि गुरु या शाही ग्रहांची स्थिती पाहून शाही स्नानाची तारीख ठरवली जाते. हे ग्रह माणसाला धन, वैभव आणि सुख प्रदान करून शाही जीवन देतात. अशा स्थितीत शाही स्नानाच्या प्रभावाने सुख-समृद्धी येते. सिद्धी प्राप्त होते. तसेच दुसऱ्या धार्मिक मान्यतेनुसार, ऋषी आणि संत, विशेषत: नागा साधूंना धर्माचे रक्षक मानले जाते. मुघल काळात, नागा साधूंनी धर्माच्या रक्षणासाठी मुघलांशी लढा दिला होता, म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी खास शाही स्नानाची व्यवस्था केली जाते. राजेशाही थाटामाटात, हत्ती, घोडे आणि रथावर बसून कुंभस्नानासाठी साधू येतात. ती पद्धत पाहून त्याला शाही स्नान म्हटले जाते.
नागा साधूंना स्नानाचा पहिला अधिकार का?
याबद्दलही एक प्राचीन धार्मिक मान्यता आहे की मुघल साम्राज्यात जेव्हा कुंभ आयोजित केला गेला तेव्हा मुघल राजांनी या श्रद्धेच्या उत्सवात व्यत्यय आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले आणि भक्तांचीही क्रूरपणे हत्या केली. मग धर्माच्या रक्षणासाठी, नागा साधूंनी आपली तपश्चर्या सोडली आणि मुघल सैन्याशी संघर्ष केला. मग नागा साधूंनीही शस्त्रे वापरली. या चकमकीत अनेक नागा साधूंनी बलिदान दिले होते. म्हणूनच नागा साधूंना धर्माचे रक्षक मानले जाते आणि त्यांचा आदर केला जातो आणि पहिल्या पहिल्या शाही स्नानाचा मान त्यांना दिला जातो.
शाही स्नानादरम्यान विशेष व्यवस्था
हिमालयात राहणारे नागा साधू-संत प्रापंचिक आसक्ती सोडून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात. ते तिथल्या हवामानाची पर्वा न करता प्रत्येक परिस्थितीत देवाचे ध्यान करतात आणि कुंभाच्या वेळी आवर्जून गंगेत स्नान करण्यासाठी येतात. शाही स्नानापूर्वी मंत्रोच्चार, शंख फुंकणे आणि धूप दीप लावून वातावरणनिर्मिती केली जाते. यानंतर नागा साधू शाही स्नान करतात. इतर भाविक नागा साधू आणि संतांच्या स्नानानंतरच स्नान करतात आणि तसे करणे भाग्याचे लक्षण मानतात.
शाही स्नान तारखा
महाकुंभ २०२५ ची सुरुवात १३ जानेवारीपासून झालीआहे. १४ जानेवारीला पहिले शाही स्नान आहे. याशिवाय आणखी २ तारखा आहेत, ज्या दिवशी शाही स्नान होणार आहे. २९ जानेवारी मौनी अमावस्या आणि ३ फेब्रुवारी बसंत पंचमी!