Life Changing Rule: सकाळी उठल्यावर 'हे' चार उपाय करा, सहा महिन्यात आयुष्य बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 05:25 PM2024-05-20T17:25:45+5:302024-05-20T17:29:03+5:30

Life Changing Rule: आयुष्याला सुयोग्य वळण लाभावे यासाठी चांगल्या सवयी लावाव्या लागतात. ज्यांचा दिनक्रम योग्य पद्धतीने ठरलेला नसतो ते लोक विस्कळीत आयुष्य जगत असतात. वेळ ढकलत असतात. अशा लोकांना अपयश, दारिद्रय, नैराश्याचा सामना रोज करावा लागतो. यशस्वी लोकांकडे बघत हे लोक देवाला आणि दैवाला बोल लावतात आणि आयुष्य कंठत राहतात. दुर्दैवाने तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असाल तर वेळीच सावरा! चांगली शिस्त अंगी बाणा, रिकामे बसू नका, सतत काही ना काही काम करत राहा आणि निरुपयोगी न राहता उपयोगी बना! एवढा साधा बदल केल्याने तुमच्या मनावरची मरगळ झटकली जाईल आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील. त्यासाठी प्राथमिक चार सवयी लावून घ्या!

दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते. ही सुरुवात मंगलमयी करण्यासाठी अंथरुणातून उठल्यापासून शिस्त अंगी बाळगावी लागेल. यशस्वी लोकांचे निरीक्षण केले तर ही गोष्ट आपल्याला नक्की जाणवेल. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सांगतो, आदल्या दिवशी मी शतकवीर म्हणून कामगिरी केली असली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता प्रॅक्टिस साठी मी मैदानात हजर असे. तिथे तीन तास घाम गाळल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नसे. या अथक मेहनतीचं फळ म्हणजेच हे भारत रत्न आज निवृत्तीचं आयुष्य आनंदाने जगतोय. असे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही स्वतःला शिस्त पुढीलप्रमाणे लावून घेतली पाहिजे.

इतर आळशी लोकांच्या तुलनेत जे लोक लवकर उठतात त्यांच्याकडे दिवसातला सगळ्यात चांगला कालावधी असतो आणि ते लोक तो वेळ सत्कारणी लावतात. म्हणून काही काम असो व नसो, ध्येय असो व नसो, सकाळी लवकर उठण्याचा सराव करा. सलग २१ दिवस ही सवय लावून घेतलीत, की यशाची पहिली पायरी सर केलीत म्हणून समजा.

सकाळची शांत वेळ मन शांत करण्यासाठी उत्तम असते. अशा वेळी ध्यानधारणा करावी. आपल्या मनात कितीही विचार येत राहिले तरी ते येऊ द्यावेत. मात्र त्या विचारांवर लक्ष न देता, आपण श्वास आत कसे घेतोय आणि बाहेर कसा सोडतोय यावर लक्ष केंद्रित करायचे. ही क्रिया घडतानाही विचारांचे चक्र सुरु राहील. ते राहू द्यावे, लक्ष श्वासांवर द्यावे. सरावाने ही गोष्ट जमू लागेल. अशा वेळी महामृत्युंजय जप करावा. आपला मेंदू, चित्त शांत ठेवण्यासाठी या मंत्राचा खूप उपयोग होईल. १०-१५ मिनिटं हा जप केल्यामुळे मनातील सकारात्मकता वाढीस लागेल आणि मनोधैर्य वाढेल.

सूर्यनमस्कार हा ध्यानधारणेचाच भाग आहे. तो शारीरिक व्यायाम असला तरी, सूर्यनमस्कार घालताना शरीरातील प्रत्येक अवयवाकडे लक्ष वाजते आणि श्वासांवर लक्ष केंद्रित होते. त्यामुळे आपसुखच इतर विषयांचा विसर पडतो आणि मन शांत होण्यास मदत होते. म्हणून सूर्यनमस्कार भरभर न घालता सावकाश घालावेत आणि प्रत्येक स्थितीत थांबून तना-मनावर लक्ष द्यावे. असे १२ नमस्कार सलग सहा महिने केले तर तुमचे शरीर तर निरोगी होईलच, पण मनदेखील कणखर होईल.

मॉर्निंग वॉक, ज्याला आपण प्रभात फेरी म्हणतो, ती रोज न चुकता करावी. अमुक एक अंतर चालावे असा काही नियम नाही, पण घरातून बाहेर निघून निसर्गाच्या सान्निध्यात जाणे आणि शुद्ध हवा शरीरात साठवून घेणे, हा त्यामागचा हेतू असतो. जेव्हा आपण सभोवताली डोळसपणे पाहतो, तेव्हा आदल्या दिवशीचा ताण, मनातले विचार नष्ट होऊन मन काही काळाकरिता शांत, स्थिर होते. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज होते. म्हणून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता प्रभात फेरी जरूर करावी.

हे साधे सोपे बदल केले तरी आयुष्य बदलू शकते, तेही सहा महिन्यात! खोटे वाटत असेल तर महिनाभर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला तुमच्यात बदल जाणवेल आणि तुमच्या आहे त्या वयापेक्षा दहा वर्ष अधिक तरुण दिसू लागाल. एकदा का या सवयी जडल्या, की तुमची रोजची सकाळ आनंददायी होईल आणि पर्यायाने सहा महिन्याच्या आत आयुष्य बदलू लागेल.