शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makar Sankranti 2021 देशभरात कशी साजरी केली जाते मकरसंक्रांती? जाणून घ्या विविध पद्धती व मान्यता

By देवेश फडके | Published: January 13, 2021 7:29 PM

1 / 7
इंग्रजी नववर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकरसंक्रांती. एकंदरीत आढावा घेतल्यास हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकरसंक्रांतीचा सण आपणास देतो.
2 / 7
संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकरसंक्राती असे म्हटले जाते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. मकरसंक्रांती म्हटले की, प्रथम आठवतात ते तीळगुळ आणि पतंग उडवणे. तसेच या दिवशी सुगड पूजा केली जाते.
3 / 7
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हे वैविध्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, परंपरा यांमध्येही असल्याचे आढळून येते. सण-उत्सव एकच असला, तरी तो साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचे दिसून येते. मकरसंक्रांतीही याला अपवाद नाही. देशपातळीवर नेमका कसा साजरा केला जातो मकरसंक्रांतीचा सण, याबाबत जाणून घेऊया...
4 / 7
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. गुजरातमध्ये संक्रातीच्या दिवशी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष सारी मंडळी पहाटेपासून रात्रीपर्यंत पतंग उडविण्यात दंग असतात. संक्रातीच्या दिवशी तळलेले पदार्थ पक्वान्न म्हणून केले जात नाहीत. तर, उत्तर भारतात तर चुलीवर तवा ठेवत नाहीत.
5 / 7
दक्षिणेत खीर केली जाते. तामिळनाडूत भोगीला 'भोगी पोंगल' म्हणतात. त्या दिवशी तिथे इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण हे प्रमुख सोपस्कार असतात. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ऊतू जाऊ देतात. या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते.
6 / 7
पूर्व भारतातील बंगालमध्ये या दिवशी वास्तुदेवता म्हणून बांबूची पूजा केली जाते. तसेच काकवीत तीळ घालून 'तिळुवा' नावाचा पदार्थ करून तो एकमेकांना दिला जातो. उत्तरेत भावजय नणंदेला घरच्या आर्थिक परिस्थितीनुरूप वस्त्र, फळफळावळ, मिठाई, तीळ, डाळ, तांदूळ असे पदार्थ भेट म्हणून पाठविते. या प्रथेला संकरांत देना असे म्हणतात. या दिवशी घरच्या आणि गावच्या देवांना तीळ-तांदूळ वाहण्याचीही प्रथा आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो.
7 / 7
महाराष्ट्रातील कोकणात घावन घाटल्यासारखे पक्वान्न केले जाते. देशावर गुळाच्या पोळ्या केल्या जातात. वांग्याचे भरीत, तीळ घातलेली बाजरीची भाकरी असा बेत हौसेने केला जातो. आपल्याकडे तीळगूळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन 'तीळगूळ घ्या गोड बोला' असा स्नेहाचा संदेश दिला जातो.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती