भारतात 'या' मंदिरांमधील शिवलिंगाचा दररोज बदलतो रंग; यामागील रहस्य काय? वाचा

By देवेश फडके | Published: February 8, 2021 08:05 PM2021-02-08T20:05:46+5:302021-02-08T20:10:12+5:30

देशात अशी काही शिवमंदिरे आहेत, जेथे शिवलिंगाचा रंग दररोज बदलतो. नेमकी कुठे आहेत ती शिवमंदिरे आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये? पाहूया...

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. संपूर्ण जग भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांकडे आदराने पाहते. प्राचीन, पुरातन काळापासून चालत आलेल्या पद्धती माणसाचे आरोग्य, विचार, संस्कार, आचार यांना समृद्ध करणाऱ्या अशाच आहेत. आपल्याकडील बहुतांश सण आणि उत्सव हे निसर्गचक्र तसेच ऋतुचक्र यांच्याशी निगडीत असल्याचे पाहायला मिळते. या सण-उत्सवांमध्ये करण्यात येणारा आहारही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

भारतात अनेक मंदिरे आहेत. श्रीविष्णू, महादेव शिवशंकर, गणपती, देवींचीही विविध मंदिरे असल्याचे पाहायला मिळते. यातील बहुतांश मंदिरांचे वेगळेपण हे पाहताक्षणी नजरेस पडते. स्थापत्यकला, नक्षीकाम, वास्तु यांमध्येही वैविध्य असल्याचे आढळते. भारतातील शेकडो मंदिरे ही हजारो वर्षांपूर्वी बांधल्याचे दाखलेही आपल्याला पाहायला मिळतात.

भक्त आणि भगवंताच्या नात्यातील हजारो रंग आपण पाहायला मिळतात. कैलास पर्वतापासून ते रामेश्वरमपर्यंत अनेक शिवमंदिरे असून, या मंदिरांमधील रहस्ये अद्भूत आणि अचंबित करणारी आहेत. देशात अशी काही शिवमंदिरे आहेत, जेथे शिवलिंगाचा रंग दररोज बदलतो. नेमकी कुठे आहेत ती शिवमंदिरे आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये? पाहूया...

पीलीभीत येथे लिलौटीनाथ शिवमंदिर आहे. अश्वत्थामाने स्थापन केलेल्या या शिवलिंगाचा रंग दिवसातून तीनवेळा बदलतो. दिवसाच्या पहिल्या प्रहरात हे शिवलिंग श्यामरंगात दिसते. दुपारच्या प्रहरात शिवलिंग तांबूस रंगाचे होते आणि दिवसाच्या उत्तरार्धात शिवलिंगाचा रंग पांढरा होतो, असे सांगितले जाते. आजही या ठिकाणी अश्वत्थामा येत असल्याचा दावा केला जातो.

राजस्थानातील धौलपूर येथील अचलेश्वर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध असून, या मंदिरातील शिवलिंगाचा रंग दिवसभरात तीन वेळा बदलतो. दिवसाच्या पहिल्या प्रहरात या शिवलिंगाचा रंग लाल असतो. दुपारच्या प्रहरात हाच लाल रंग केशरी होतो आणि सायंकाळी हेच शिवलिंग श्यामरंगात दिसते. शिवलिंगाचा रंग सतत बदलता का राहतो, हे एक गूढ आहे. आतापर्यंत यावर अनेक संशोधन झाले. मात्र, शिवलिंगाचा रंग का बदलतो, याचे उत्तर कुणाकडेही नाही.

उत्तर प्रदेशातील घाटमपूर जिल्ह्यातील सिमौर या गावात कालेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाचा रंग दिवसातून काही वेळा बदलतो. मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या शिवलिंगाचा रंग का बदलतो, याचे उत्तर अद्याप कुणालाही शोधता आले नाही. शिवलिंगाच्या बदलत जाणाऱ्या रंगाचे महत्त्व वेगळे आहे. यातील प्रत्येक रंग शिवाचा महिमा दर्शवतो, असे सांगितले जाते.

बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील दुल्हन शिवालय नावाचे एक शिवमंदिर आहेत. या मंदिर परिसरात दोन मंदिरे असून, ती सासू आणि सूनेने स्थापन केल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे या शिवलिंगाचा रंग बदलतो. सूर्य जसजसा प्रकाशमान होतो, तसा या मंदिरातील शिवलिंगाचा रंग गडद होत जातो आणि दिवसाच्या उत्तरार्धात शिवलिंगाचा रंग फिकट होतो, असे सांगितले जाते.

उत्तर प्रदेशातील चकरपूर येथील जंगलात बनखंडी महादेव मंदिर आहे. रोहिणी नक्षत्रावर येणाऱ्या शिवरात्रीला या मंदिरातील शिवलिंगाचा रंग बदलतो. एका दिवसात हे शिवलिंग सप्तरंगात न्हाऊन निघते. या मंदिराची स्थापना सन १८३० मध्ये करण्यात आली होती. या शिवलिंगाचा रंग त्याच कालावधीत का बदलतो, या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनुत्तरित आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खीर जिल्ह्यात असलेले शिवमंदिर हे विलक्षण कारणासाठी जगप्रसिद्ध आहे. नर्मदेश्वर महादेव मंदिर, असे नाव असलेल्या या मंदिरात चक्क बेडकाची पूजा केली जाते. या मंदिरातील शिवलिंगाचा रंग दररोज बदलतो. नर्मदेश्वर मंदिरातील शिवलिंगाचा रंग दररोज कसा व का बदलतो, हे अद्यापही रहस्य बनलेले आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले होते.

टॅग्स :मंदिरTemple