ज्येष्ठ अमावास्येला दुर्मिळ योग: ‘हे’ ७ सोपे उपाय करा; पितृदोषातून मुक्त व्हा, धनवृद्धी मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:48 PM2022-06-27T13:48:43+5:302022-06-27T13:53:26+5:30

जून महिन्याच्या ज्येष्ठ अमावास्येला दुर्लभ योग जुळून येत असून, काही सोपे उपाय करून कुंडलीतील दोषांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, जाणून घ्या...

जून महिना ज्योतिषीय तसेच धार्मिक आणि सांस्कृतिदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचा ठरला. या महिन्यात अनेक महत्त्वाच्या ज्योतिषीय घटना, सण-उत्सव, व्रत साजरी करण्यात आली. आता जून महिन्याची सांगत होत आहे. (Jyestha Amavasya 2022)

जून महिन्याच्या अखेरिस ज्येष्ठ अमावास्या आहे. विशेष म्हणजे २८ आणि २९ या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. सूर्योदयाला येणारी तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी अमावास्या असल्याचे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ अमावस्या २८ जून रोजी पहाटे ५.५१ वाजता सुरू होत असून ती २९ जून रोजी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत असेल. याचाच अर्थ अमावस्या तिथी आणि त्यासंबंधित नियम २८ जून रोजी पाळणे बंधनकारक ठरेल.

२८ तारखेला अमावस्या अहोरात्र आहे आणि २९ ला सकाळीदेखील सूर्योदयाची तिथी बघणार आहे, त्यामुळे हा दुर्मिळ योग असल्याचे सांगितले जात आहे. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर ज्येष्ठ अमावस्येचा दिवस यासाठी खूप चांगला आहे.

ज्येष्ठ अमावस्येला पितृ तर्पण करून श्राद्ध कर्म केल्याने पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो. याशिवाय ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे पितृदोष दूर होतो. जाणून घेऊया...

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. तुम्हाला शक्य असेल तर गंगा नदीत स्नान करावे. गंगा नदीत डुबकी शक्य नसेल, तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करावे. नंतर पितरांसाठी काही दान करा आणि तर्पण करा. असे केल्याने पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला कलशातून पाणी, दूध आणि साखर अर्पण करा. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील दोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सायंकाळी पूजा केल्यानंतर दक्षिण दिशेला चौमुखी तेलाचा दिवा लावा. यासोबत गोमातेल अन्नदान करावे. असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे रोप लावावे आणि दूधयुक्त पाणी अर्पण करावे. शक्य असेल, तर प्रत्येक अमावास्येला या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो, असे म्हटले जाते.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी परिचितांना श्रद्धेने घरी बोलावून खाऊ घाला आणि पितरांना प्रिय असलेल्या वस्तू दान करा.

ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी भगवद्गीता गीता किंवा रामचरितमानस पठण केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीतून दोष दूर होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी जलचरांना अन्नदान करावे. यासोबतच घराच्या ईशान्य दिशेला गाईच्या तुपाचा दिवा लावावा, असे केल्याने धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतात, अशी मान्यता आहे.