janmashtami 2021 : समस्त इच्छापूर्तीसाठी जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणा 'हे' कृष्णमंत्र, सोपे होईल जगण्याचे तंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:47 IST2021-08-26T16:18:45+5:302021-08-26T16:47:38+5:30
Janmashtami 2021 :जन्माष्टमी हा अशा युगपुरुषाचा जन्मोत्सव आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जगावे याचा आदर्श जगाला घालून दिला. तो युगपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! त्याने जन्म घेतला तो कारावासात, मुसळधार पावसात, मिट्ट काळोख्या रात्री कोणालाही भयाण वाटावा असा तो क्षण मात्र गोपालकृष्णाच्या जन्माने पावन झाला. कितीही कठीण प्रसंग असो, प्रबळ इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे त्याने जन्मतः दाखवून दिले आणि आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर हसतमुखाने मात करायलाही शिकवले.

अशा या गोपाळ कृष्णाची जन्मवेळ अनन्यसाधारण मानली जाते. श्रावण वद्य अष्टमीला तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या कालमापानुसार सुमारे १२. ४० मिनिटांनी कृष्ण जन्म झाला.यंदा ३० ऑगस्ट रोजी सोमवारी कृष्णजन्मोत्सव आहे. या योग अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा. कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून पुढील मंत्र म्हणावा. हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्रांची प्रचिती येते. आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त १०८ अन्यथा कमीत कमी ११ वेळा जप जरूर करावा.
मनोकामना पूर्ण करण्यासाठी -
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिशां पते! नमस्ते रोहिणी कान्त अर्घ्य मे प्रतिगृह्यताम्!!
संतानप्राप्तीसाठी -
देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते! देहिमे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः!!
विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी-
ओम् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्ल्भाय स्वाहा।
शांत-समाधानी जीवन जगण्यासाठी-
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
नोकरी, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी-
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्