Vrat and Festival July 2021: अंगारकी संकष्टी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा; ‘हे’ आहेत जुलै महिन्यातील मुख्य सण-उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:27 PM2021-06-29T21:27:17+5:302021-06-29T21:31:48+5:30

Vrat and Festival July 2021: जुलै महिन्यात साजऱ्या होत असलेल्या सणांचे केवळ धार्मिक नाही, तर, सामाजिक आणि शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व आहे, असे सांगितले जाते.

जुलै महिना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चार मोठे ग्रह मार्गी चलनाने राशीपरिवर्तन करणार आहेत. (Vrat and Festival July 2021 Dates)

यामध्ये बुध, सूर्य, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा समावेश आहे. तसेच सूर्य पुष्य नक्षत्रातही प्रवेश करणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव, व्रते साजरी केली जाणार आहेत. (Vrat and Festival July 2021 Significance)

जुलै महिन्यात साजऱ्या होत असलेल्या सणांचे केवळ धार्मिक नाही, तर, सामाजिक आणि शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व आहे, असे सांगितले जाते. याच महिन्यात मराठी वर्षातील आषाढ महिन्याला सुरुवात होत असून, चार्तुमासाला प्रारंभ होणार आहे.

योगिनी एकादशी: ज्येष्ठ महिन्यातील वद्य एकादशी योगिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी सोमवार, ५ जुलै २०२१ रोजी योगिनी एकादशी आहे. भगवान श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व विषद केले आहे. याच दिवशी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार असून, संत निवृत्तीनाथ यात्रा आहे. (Yogini Ekadashi 2021 Date)

गुप्त नवरात्र: संपूर्ण वर्षभरात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र खुलेपणाने साजरा केले जाते. मात्र, दोन नवरात्र अत्यंत गुप्तपणे साजरी केली जातात. त्यातील एक नवरात्र आषाढ महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून साजरे केले जाते. रविवार, ११ जुलै २०२१ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तंत्र-मंत्र करणाऱ्या व्यक्ती विशेष करून हे नवरात्र साजरे करतात. (Gupt Navratri 2021 Date)

जगन्नाथ रथयात्रा: ओडिशा राज्यातील पुरी येथून जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावत असतात. आषाढ शुद्ध द्वितीयेला या रथयात्रेचे आयोजन केले जाते. सोमवार, १२ जुलै २०२१ रोजी रथयात्रा आहे. श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांना रथात स्थानापन्न करून ही यात्रा काढली जाते. (Jagannath Rath Yatra 2021 Date)

देवशयनी आषाढी एकादशी: आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा मंगळवार, २० जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पायी वारी रद्द करण्यात आली असून, संतांच्या पादुका थेट पंढरपुरात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होईल. (Ashadhi Devshayani Ekadashi 2021 Date)

बकरी ईद: मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. यंदा बुधवार २१ जुलै २०२१ रोजी बकरी ईद आहे. याच दिवशी वामन पूजन आहे. (bakrid 2021 Date)

गुरुपौर्णिमा: आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. यावर्षी शुक्रवार, २३ जुलै २०२१ रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. संगीत, साहित्य क्षेत्रात हा दिवस विशेष साजरा करण्यात येतो. याच दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती आहे. (Guru Purnima 2021 Date)

अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, २७ जुलै २०२१ रोजी आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. विशेष म्हणजे मंगळवारी चतुर्थी येत असल्यामुळे या दिवशी अंगारक योग जुळून येत आहे. विशेष म्हणजे आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी चतुर्थीही मंगळवारी येत असल्यामुळे विनायक चतुर्थीलादेखील अंगारक योग जुळून येत आहे. मंगळवार, १३ जुलै रोजी विनायक चतुर्थी आहे. (Angarika Sankashti July 2021 Date)

Read in English