Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग: ७ राशींना पुढील ७ महिने अनुकूल, सकारात्मक; धनलाभाच्या संधी, राहु शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 07:07 AM2023-04-23T07:07:07+5:302023-04-23T07:07:07+5:30

Guru Chandal Yog 2023 In Marathi: नोकरी, शिक्षण, आर्थिक आघाडीवर गुरु चांडाळ योगाचा कसा प्रभाव असू शकेल? तुमच्या राशीसाठी हा योग कसा ठरू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत विराजमान झाला आहे. गुरु सुमारे एक वर्ष मेष राशीत स्थानापन्न असेल. गुरु अस्तंगत असताना मेष राशीत आला असून, एप्रिल महिन्याच्या अखेरीस गुरुचा उदय होत आहे. त्यांनतर श्रावणी सोमवारी ०४ सप्टेंबर २०२३ रोजी गुरु मेष राशीत वक्री होणार असून, ३१ डिसेंबर २०२३ रोजी मार्गी होणार आहे. (Guru Chandal Yog 2023)

गुरुने मेष प्रवेश केल्यानंतर लगेचच अश्विनी नक्षत्रातही प्रवेश केला आहे. २१ जून २०२३ पर्यंत गुरु अश्विनी नक्षत्रााच्या पहिल्या चरणात विराजमान असेल. गुरुने मेष राशीत प्रवेश केल्यानंतर गुरु चांडाळ योग जुळून येत आहे. राहु ग्रहासोबत गुरु ग्रह असेल, तर निर्माण होणाऱ्या योगाला गुरु चांडाळ योग असे म्हटले जाते. गुरु हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. तर राहु हा नवग्रहातील छाया आणि क्रूर ग्रह मानला जातो. (jupiter rahu conjunction in aries 2023)

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु बलवान असेल, तर या योगाचा अधिक प्रतिकूल प्रभाव दिसून येतो. मात्र, जर गुरु ग्रह बलवान असेल, तर योगाचा फारसा परिणाम दिसून येत नाही, असे म्हटले जाते. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहु मेष राशीतून वक्री चलनाने मीन राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत गुरु चांडाळ योग कायम राहणार आहे. गुरु चांडाळ योगाचा देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभाव दिसू शकेल. काही राशींना हा योग शुभ, तर काही राशींना संमिश्र ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मेष राशीत गुरु चांडाळ योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना हा योग अनुकूल ठरू शकेल. अनामिक भीती, नकारात्मकता यांचे सावट हळूहळू कमी होऊ शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होतात, ती पूर्णत्वाकडे जाताना दिसू शकेल. नवीन कामे हातात घेऊ शकाल. मतभेदाचे मळभही दूर होऊ शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग सकारात्मक ठरू शकेल. परदेशात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल. कर्जाची परतफेड वेग धरू शकेल. योग, आयुर्वेद किंवा ज्योतिष, वास्तु या गोष्टी शिकण्याकडे कल राहू शकेल. तसेच त्यात गतीही मिळू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग अनुकूल ठरू शकेल. नवीन मित्र होऊ शकतील. प्रवासात नव्या संधी प्राप्त होऊ शकतील. नवीन युट्युब चॅनल किंवा सोशल मीडियावर नवीन गोष्टी सुरू करण्यास आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नातेसंबंध दृढ होऊ शकतील. सकारात्मक वातावरण आणि नवीन आत्मविश्वास रुजू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग सकारात्मक ठरू शकेल. कामात सुसूत्रता आणावी. सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर समस्यांचा सामना तसेच निराकरण करण्यात यश मिळू शकेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. कालांतराने ते दूर होऊ शकतील. आपल्या गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतील. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कार्यालयातील वरिष्ठ, वडील किंवा गुरुसमान व्यक्तीशी मतभेद होऊ शकतील. मात्र, कालांतराने परिस्थिती अनुकूल होऊ शकेल. मतभेद दूर होऊ शकतील. आत्मपरीक्षण करण्यासाठी आगामी काळ सार्थकी लागू शकतो. प्रवासाच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी आगामी काळ अनुकूल ठरू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. शंका, समस्यांचा सामना करावा लागू शकेल. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठ, वडील तसेच तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक संबंध दृढ होऊ शकतील. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल. योग, ध्यानधारणा करणे हिताचे ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकेल. या राशीत केतु विराजमान आहे. ऑक्टोबर महिन्यात राहुसह केतु राशीपरिवर्तन करेल. केतु वक्री चलनाने कन्या राशीत प्रवेश करेल. यानंतरचा काळ बराचसा अनुकूल होऊ शकेल. दिलासादायक घटना घडू शकतील. जीवनसाथीशी संबंध दृढ होऊ शकतील. आर्थिक आघाडीवर अनेक चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. भावंडांमधील मतभेद दूर होऊ शकतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. अडचणी, समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडू शकतो. तीर्थस्थळी जाण्याचा बेत आखू शकाल. आरोग्याची काळजी घ्यावी.

धनु राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग सकारात्मक ठरू शकेल. कामावर लक्ष केंद्रीत करून त्यात सुधारणा करण्यासाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकतील. मित्रमंडळींमध्ये भर पडू शकेल. जनसंपर्क वाढू शकेल. आरोग्याविषयी जागरूक असावे.

मकर राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग अनुकूल ठरू शकेल. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल. वारसाहक्कातून लाभ मिळू शकतात. योग, आयुर्वेद किंवा ज्योतिष, वास्तु या गोष्टी शिकण्याकडे कल राहू शकेल. तसेच त्यात गतीही मिळू शकेल. लांब पल्ल्याचे प्रवास घडू शकतील. नोकरीत बढती, पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग सकारात्मक ठरू शकेल. नवीन युट्युब चॅनल, इन्स्टाग्राम पेज किंवा सोशल मीडियावर नवीन गोष्टी सुरू करण्यास आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होऊ शकतील.

मीन राशीच्या व्यक्तींना गुरु चांडाळ योग अनुकूल ठरू शकेल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आहारचर्येवर फेरविचार करण्यासाठी आगामी काळ सार्थकी ठरू शकेल. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.