By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 21:35 IST
1 / 6मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा. यावर्षी तिथींच्या क्षयामुळे तारखेबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली, तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. 2 / 6यावर्षी गुढीपाडवा १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे. १८ मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती १९ मार्चच्या सकाळी होत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार १९ मार्च हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आला आहे.3 / 6१९ मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा 'क्षय' आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल. त्यानंतर, अर्थात सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनंतर कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. 4 / 6केवळ गुढीच नाही, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीही अमावस्या संपल्यानंतरच करावेत. जसे की, पंचांग पूजन व गणपती पूजन हेदेखील सकाळी ६:५३ नंतरच करावे. तसेच याच तिथीला श्रीराम नवरात्र व वासंतिक नवरात्र सुरु होते, त्यासंबंधित विधीदेखील ६:५३ नंतरच करावेत. 5 / 6चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी 'क्षय' असली, तरी तो दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास हरकत नाही. सोने, नवीन जागा (Property), वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हा दिवस निवडू शकता.6 / 6अमावस्या समाप्तीनंतर गुढी पूजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९ मार्च २००७, ६ एप्रिल २००८ आणि २८ मार्च २०१७ रोजीदेखील अशाच प्रकारे अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारण्यात आली होती. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता आनंदात नवीन वर्षाचे स्वागत करा.