शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शांत झोपेसाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका, फक्त 'पाच' बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 5:41 PM

1 / 5
संध्याकाळी अल्प आहार घ्या. पचायला हलके असतील असे पदार्थ सेवन करा. सूर्यास्तानंतर आपला जठराग्नी मंद होतो. त्यामुळे पचनशक्ती कमी होत जाते. पोट जड असेल, तर झोप शांत लागत नाही. म्हणून तुमच्या झोपेच्या वेळेपूर्वी किमान चार तास आधी जेवून घ्या. पोट हलके असले, की झोप छान लागते आणि सकाळी आपसुख जाग येते.
2 / 5
कितीही थकवा आला, तरी आंघोळ केल्यामुळे तो त्वरित दूर होतो. म्हणून झोपण्याआधी आंघोळ केलीत, तर दिवसभराचा थकवा चुटकीसरशी दूर होईल. लोकांचा गैरसमज आहे, की झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने झोप उडते. पण तुम्ही लहान बाळांना पाहिले आहे ना? आंघोळ घातली, तीट पावडर केली, सुती झबले घालून दुपट्यात गुंडाळले की क्षणार्धात गाढ झोपी जातात. आपण वयाने मोठे झालो, तरी देहाला आजही या गोष्टी मानवतात. म्हणून दुसऱ्यांचे अनुभव ऐकण्याऐवजी स्वत: अनुभव घ्या. आंघोळीने तनामनावरचा थकवा दूर होईल आणि शांत झोप लागेल.
3 / 5
झोपेच्या खोलीत नाईट लॅम्पऐवजी किंवा नाईट लॅम्पव्यतिरिक्त तेलाचा किंवा तुपाचा दीवा लावा. अंधाऱ्या खोलीत मंदपणे तेवणारी ज्योत तुमच्या मनातील कोलाहल शांत करेल. विचारांचे चक्र थांबवेल. मन शांत झाले, की देहावरचा ताणही आपोआप कमी होईल. झोप शांत लागेल.
4 / 5
झोपण्यापूर्वी बिछान्यावर काही क्षण सुखासनात बसा. डोळे बंद करा. दिवसभरातील शेकडो विचार तुमच्या डोक्यात थैमान घालतील. घालू द्या. हळू हळू ते विचार दूर होतील. तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला ताण दूर होत असल्याचा अनुभव येईल. झोप येईल आणि पाठ टेकवता क्षणीच तुम्ही गाढ झोपी जाल.
5 / 5
प्राणायामाबरोबरच रोज रात्री स्वत:ला जाणीव करून द्या. ज्या गोष्टीचा मी एवढा ताण घेतोय, ती गोष्ट, तो विचार फार काळ टिकणारा नाही. चांगले वाईट दिवस प्रत्येकाच्या वाट्याला येतात. माझ्याही येतील. मी माझी जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत आहे. उर्वरित गोष्टी परमेश्वरावर सोपवून मी निश्चिंतपणे झोपणार आह़े हा आत्मसंवाद महत्त्वाचा आहे. तुम्हाला या शब्दांचा दिलासा मिळेल. नव्या दिवसाची प्रेरणा मिळेल. ऊर्जा मिळेल. अलार्म लावण्याची वेळ येणार नाही. कारण तुमच्या मनाने तुमची जबाबदारी स्वीकारलेली असेल. त्यामुळे तुम्हाला वेळेत जाग येईल आणि तुम्ही प्रसन्न दिवसाची दमदार सुरुवात कराल.