Astro Tips: नावाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतोच; त्यामुळे बाळाचे नाव ठेवताना योग्य ती काळजी घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:28 AM 2023-11-01T11:28:07+5:30 2023-11-01T11:32:19+5:30
Astro Tips: नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठेवले, की त्याचे रडणे थांबते. सोहम अशी त्याची ओळख पटते. या नामविधीला अतिशय महत्त्व असते. बाळ जन्माला आल्यापासून त्याचे नाव काय ठेवायचे, यावर घरात मोठी चर्चा सुरू असते. कधी ते राशीवरून ठेवले जाते, तर कधी रूपावरून, कधी आवडीवरून तर कधी पूर्वजांच्या आठवणीवरून. नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते. अलीकडचे आई बाबा मॉडर्न नावांवर भर देतात, नावांची पुस्तक धुंडाळतात, पोथ्या-पुराणांतून `युनिक' नाव शोधून काढतात, थोडक्यात बरीच खटपट करतात.
आज जगदसुंदरी ऐश्वर्या रायचा वाढदिवस आहे. तिच्याजवळ असलेले ऐश्वर्य पाहता नाव सार्थकी लागले किंवा तिने ते प्रयत्नपूर्वक लावले असे म्हणता येईल.सौंदर्य आहेच, त्याला मिस वर्ल्डची मोहोरही लागली. बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूडमध्ये नाव कमावून आज ती बच्चन खानदानची सून आहे. हे म्हणजे दुग्धशर्करा, केशर, वेलची सगळंच जुळून आलं म्हणता येईल. अर्थात काही गोष्टी तिला मिळत गेल्या तर काही तिने प्रयत्नपूर्वक मिळवल्या यात वादच नाही. म्हणून नाव ठेवायचंच आहे, तर असे ठेवावे, ज्याला चांगले वलय असेल आणि ते नाव सार्थकी लावण्याचे बाळाला भविष्यात प्रोत्साहन मिळेल. यासाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेले नियम लक्षात ठेवा.
राशीनुसार नाव काही ठिकाणी आपण पाहिले असेल तर एकाच व्यक्तीची दोन नावे असतात. एक कागदोपत्री आणि दुसरे पाळण्यातले. कागदोपत्री असलेले नाव पालकांच्या आवडीचे असू शकते. तर पाळण्यातले नाव ज्योतिषांनी सुचवलेल्या आद्य अक्षरावरून ठेवलेले असते. तसे करण्यास काहीच हरकत नाही. ग्रह, नक्षत्राचा प्रभाव त्या नावावर पडतो आणि त्याचे लाभही मिळतात.
योग्य दिवसाची निवड बाळाचे बारसे करायचे तर योग्य दिवसाची, योग्य मुहूर्ताची निवड करणे हितावह ठरते. शुभ मुहूर्त म्हणजे तरी काय, तर योग्य आणि अनुकूल ग्रहस्थिती! हा मुहूर्त दिनदर्शिकेत, पंचांगात दिलेला असतो. नाहीतर पुरोहितांकडूनही आपल्याला शुभमुहूर्त जाणून घेता येतो. त्या मुहूर्तावर बारसे करता येते. ज्योतिष शास्त्रानुसार बाळाचा नामकरण विधी जन्मानंतरच्या अकराव्या, सोळाव्या दिवशी करावा. मात्र पौर्णिमा, आमावस्या या तिथी शक्यतो टाळाव्यात.
नक्षत्राची काळजी घ्या बारसं करण्यासाठी अनुराधा, पुनर्वसु, मघा, उत्तराषाढा, शतभिषा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशीर, रेवती, हस्त आणि पुष्य नक्षत्र हे नामकरण शुभ मानले गेले आहे.
नावाला अर्थ हवा नावाचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो. म्हणून केवळ आईवडिलांच्या नावातून नवीन नावाला जन्म देणे योग्य नाही. त्या नावाला चांगला अर्थ हवा. म्हणूनच इथे ऐश्वर्याचे उदाहरण सुरुवातीलाच दिले आहे. नाव जसे, लक्षण तसे, हे कायम ध्यानात ठेवा.
संख्याशास्त्रानुसार नाव अलीकडे अंकशास्त्रानुसारही नावाची निवड केली जाते. एखाद्या नावात अमुक एक स्पेलिंग असेल, किती अक्षरी नाव असेल तरच शुभ, याचे ठोकताळे सांगितले जातात. विशेषतः सेलिब्रेटी आपल्या नावात असे बदल करून घेतात. तुम्ही सुद्धा अंकशास्त्रावर विसंबून असाल तर बारशापूर्वीच तुम्हाला या शास्त्राचा आधार घेऊन बाळाचे नामकरण करणे सोपे जाईल.