Astro Tips: आर्थिक प्रश्न, नोकरीत त्रास आणि बॉसचा जाच होत असेल, तर गुरुवारी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 07:00 IST2024-12-18T07:00:00+5:302024-12-18T07:00:02+5:30

Astro Tips: नोकरी किंवा उत्पन्नाचे भरभक्कम, स्थिरस्थावर साधन नसेल तर आयुष्यात अशांतता वाढत जाते. कारण, सगळी सोंगं आणता येतात पण पैशांचे सोंग आणता येत नाही. अशातच नोकरी, व्यवसायात पैशांच्या समस्यां येऊ लागल्या, तर संसाराची घडी मोडते. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करण्याबरोबरच ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा, जेणेकरून तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

संकट सांगून येत नाही आणि आले की हातात हात घालून येते. अशा स्थितीत माणूस खचतो, डगमगतो, गहिवरतो, हतबल होतो. त्यात आर्थिक भार हा न पेलवणारा, खचून टाकणारा असतो. अशा वेळी प्रयत्न, सातत्य टिकवून ठेवत दैवाचा कौल मिळवण्यासाठी दिलेले सोपे उपाय करा, जेणेकरून आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडेल.

हा उपाय केवळ आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नाही, तर नोकरीत, व्यवसायात प्रगती होत नसेल, पदोन्नती होत नसेल, पगारवाढ होत नसेल किंवा सहकाऱ्यांचा, बॉसचा त्रास होत असेल तर दिलेला उपाय कामी येईल आणि तुमच्या मार्गातील अडचणी दूर होण्यास मदत होईल असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. ते उपाय कोणते ते जाणून घेऊ.

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवारी हळकुंड अर्थात अख्खी हळद झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवा. हळदीचा वापर शुभ मंगल निर्मितीसाठी तर होतोच, शिवाय जखम बरी करण्यासाठी जसा अँटीसेप्टिक म्हणून वापर होतो, तसा आर्थिक दोष दूर करण्यासाठीही वापर होतो. असे केल्याने तुम्हाला नोकरीमध्ये येणाऱ्या समस्यांपासून किंवा नवीन नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणींपासून आराम मिळेल आणि काही दिवसांतच तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. तसेच गुरुबळ वाढेल.

गुरुवारी कुंकू मिश्रित हळदीचे गंध लावल्याने अनेक फायदे होतात. असे मानले जाते की हळद आणि कुंकू यांचे गंध लावल्याने सौंदर्यात तर भर पडतेच, शिवाय भाग्य उजळते आणि संपत्ती वाढते. आर्थिक प्रश्नातुन सुटका होते. गुरुचे पाठबळ मिळते आणि भाग्योदय होतो.

तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण येत असेल किंवा ऑफिसमध्ये काही समस्या येत असतील तर रविवारी मीठाचे सेवन करू नका. ज्योतिष शास्त्रानुसार रविवार हा सूर्य ग्रहाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी मिठाचे सेवन 'न' केल्याने कुंडलीत रविचे स्थान बळकट होते, शत्रूंचा धोका टळतो, सहकारी तसेच बॉसशी संबंध सुधारतात.

नोकरीच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी गायीला गूळ, हरभरा आणि कडधान्ये खाऊ घाला आणि तव्यावरची पहिली भाकरी नियमित खाऊ घाला. असे केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आणि बिघडलेले काम सुधारेल. तसेच इतर ग्रह अनुकूल होऊन ग्रहांचा शुभ प्रभाव पडेल. आयुष्यात येणाऱ्या समस्या कमी होऊ लागतील.

करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक स्थैरायासाठी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करा आणि संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करून अन्न आणि पाणी सेवन करा. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची शीतलता तुमच्या आयुष्यात उतरेल आणि तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.या उपायामुळे तुमचे सहकाऱ्यांशी तसेच नातलग, मित्रपरिवार यांच्याशी संबंध सुधारतील.