Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार सुटे पैसे आणि नोटा एकाच पाकिटात ठेवाल तर कंगाल व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:00 IST2025-01-17T07:00:00+5:302025-01-17T07:00:02+5:30

Astro Tips: पगार होता होता पैशाला पाय फुटतात आणि पुढच्या तासाभरात ते संपतात. होम लोन, कार लोन, हेल्थ इन्शुरन्स, एफ डी, मुलांची शैक्षणिक फी, त्यांच्या गरजा, घरसामान, इलेक्ट्रिक बिल, मेंटेनन्स, दूध, पेपर, फुलपुडी बिल अशी न थांबणारी यादी समोर येते आणि पैशांचे कापरासारखे संप्लवन होते. पैसे कितीही कमावले तरी ते खर्च होण्याचे मार्गही आपोआप तयार होतात. पैसे जमवण्यासाठी सेव्हिंग हा पर्याय आहेच, पण त्याबरोबरीने ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय केले, तर सगळी देणी देऊनही तुमचे पैसे शिल्लक राहतील आणि वाढतीलही!

वेळ आणि पैसा जपून वापरला नाही किंवा त्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात रडण्याची वेळ येते. म्हणून या दोन्ही गोष्टींचे नियोजन प्रत्येकाला करता आलेच पाहिजे. आणि जिथे आपले प्रयत्न संपतात, तिथे ज्योतिष शास्त्राचीही मदत घेतली पाहिजे.

ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय पैशाचा ओघ वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. ज्यामुळे तुमचे पाकीट रिकामे होणार नाही आणि त्यात कालांतराने पैसेही वाढू लागतील. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे डोळसपणे लक्ष द्या, त्यात मुख्य भाग असतो पैशांच्या पाकिटाचा.

काही लोकांची पर्स फाटलेली असते, तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात, अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. फाटक्या, तुटक्या वस्तूंचा वापर दारिद्र्याला आमंत्रण देतो. अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि पैशांचा क्षय होतो. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फाटके पाकीट वापरणे बंद करा. एक तर ते शिवून घ्या किंवा दुसरे पाकीट विकत घ्या, पण फाटके पाकीट वापरू नका.

पाकीट पैसे ठेवण्यासाठी असते हे माहीत असूनही आपण त्यात ट्रेन, बसची तिकिटे, मेडिकल, किराणा सामानाचे कागद, मेडिकल रिपोर्ट, पासपोर्ट साईज फोटो, देवांचे फोटो, घरच्यांचे फोटो असे कितीतरी सामान ठेवतो. मात्र ज्योतिष शास्त्र सांगते, अशा ठिकाणी भावनिक न होता पैशांच्या पाकिटाचा वापर पैसे ठेवण्यापुरताच करा. अनावश्यक वस्तू काढून टाका. फार तर लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा श्रीयंत्र, कुटुंबाचा फोटो आणि गरजेला लागला तर असावा म्हणून एखादा पासपोर्ट साईज फोटो, क्रेडिट, डेबिट कार्ड एवढ्याच गोष्टी ठेवा. अनावश्यक व्हिझिटिंग कार्ड ठेवून गर्दी करू नका.

पैशांच्या तुलनेत नोटांचे मोल अधिक हे आपण जाणतो. असे असतानाही अनेक जण एकाच पाकिटात पैसे आणि नोटांची सरमिसळ करतात. ज्योतिष शास्त्र सांगते, तसे न करता सुट्या पैशांसाठी छोटी पर्स वापरा आणि नोटा वेगळ्या ठेवा. दोन पाकिटं वापरणे शक्य नसेल तर दोन कप्प्यानमध्ये स्वतंत्र ठेवा. फाटक्या नोटा बदलून घ्या पण पाकिटात ठेवू नका. नोटा दुमडून न ठेवता व्यवस्थित उघडून शक्यतो ताठ स्थितीत ठेवा.

मंगळवार तसेच शुक्रवार देवीचे मानून आपण लक्ष्मीचे पूजन करतो. त्या पूजेत देवीच्या पायाशी वाहिलेल्या अक्षतांचे चार दाणे अर्थात हळद कुंकू लावलेले तांदूळ पाकिटात ठेवा. त्यामुळेही तुमच्या धन, समृद्धीत वाढ होईल आणि पैशांची उणीव भासणार नाही.