Akshaya Tritiya 2022: आजची अक्षय्य तृतीया 'या' चार राशींना फळणार; लक्ष्मी मातेची कृपा बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:35 PM2022-05-03T12:35:30+5:302022-05-03T12:42:11+5:30

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेचा सण खूप शुभ आहे आणि यावेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या दुर्मिळ स्थितीमुळे तो आणखी वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेला पंच महायोग होत आहे. हा योग ४ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ स्थिती निर्माण करत आहे. या सणाच्या निमित्ताने सोने खरेदी तसेच अन्य गोष्टींच्या खरेदी बरोबरच दान धर्म केला असता लक्ष्मी मातेची कृपा बरसेल आणि अक्षय्य तृतीयेच्या सणाचा आनंद द्विगुणित होईल.

अक्षय्य तृतीया हा सण वैभवाचे दान पदरात टाकणारा सण आहे. त्यासाठी या दिवशी लक्ष्मी मातेची तसेच भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी खरेदी इतकेच महत्त्व असते, दानधर्माला. ज्याप्रमाणे आपल्याला भगवंताकडून काही मिळावे अशी अपेक्षा असते, त्याप्रमाणे आपणही कोणासाठी दाता बनून त्यांची इच्छापूर्ती करावी अशी गरजवंतांची अपेक्षा असते. हे दातृत्त्व लक्ष्मी मातेला भावते आणि ती आपला कृपाशिर्वाद अशा भक्तांवर कायम ठेवते.

आजचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस सर्वांसाठी चांगला आहेच, परंतु ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस चार राशींसाठी जास्त अनुकूल ठरणार आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊ.

वृषभ राशीच्या लोकांसाठी ही अक्षय्य तृतीया खूप खास आहे. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळू शकते. जे नवीन काम सुरू करत आहेत, त्यांना खूप फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.

ही अक्षय्य तृतीया कर्क राशीच्या लोकांना मोठे यश देऊ शकते. भाग्य त्यांना साथ देईल. पदोन्नती होऊ शकते, पगारवाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. लवकरच एखाद्या सहलीला जाण्याचा योग येईल आणि आनंद दुणावेल.

धनु राशीच्या लोकांसाठी ही अक्षय्य तृतीया खूप शुभ आहे. आतापर्यंत रखडलेली कामे आता पटापट आणि निर्विघ्नपणे पूर्ण होतील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. आर्थिक अडचणींवर मात करता येईल.

मकर राशीच्या लोकांसाठी ही अक्षय्य तृतीया शुभ राहील. जुन्या त्रासातून सुटका मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळेल. आर्थिक वाढ होण्याची दाट शक्यता आहे.