चाणक्यनीतीनुसार 'या' गोष्टींबद्दल कायम मौन बाळगा अन्यथा सर्वनाश ओढवून घ्याल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:43 PM2022-02-24T12:43:53+5:302022-02-24T12:49:34+5:30

'सुख सांगावे सकळांसी, दुःखं सांगावे देवासी' अशी आपल्या संतांची शिकवण आहे. समर्थ रामदास स्वामी तर सांगतात, व्यक्ती कितीही परिचयाचा असो, पण 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येति तदनंतरे' अर्थात सुरक्षित अंतर आणि मोजका संवाद ठेवलात तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. कारण आज जी व्यक्ती आपली मित्र आहे ती उद्या आपली शत्रू झाली तर आपली सगळी गुपिते तिला ठाऊक असतात. त्याचा दुरुपयोग भविष्यात केला जाऊ शकतो. म्हणून वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम मौन पाळावे असे आचार्य चाणक्य देखील सांगतात.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये धर्म-अधर्म, कर्म, पाप-पुण्य इत्यादी बद्दल सांगितले आहे. चाणक्याच्या या धोरणांद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम बनवू शकते. त्यासाठी आवश्यक ठिकाणी गोपनीयता राखायलाच हवी.

आचार्य सांगतात, आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करू नका. कमी असेल तर तेदेखील भासवु नका. तुमच्या श्रीमंतीचा फायदा घेणारे लोक असतात तसेच गरिबीचा फायदा घेऊन तुम्हाला आर्थिक मदत करून गुलाम बनवू पाहणारेही लोक असतात. आपल्या परिस्थितीशी आपल्याला झुंज द्यायची असते, त्यामुळे आपल्या परिस्थीचे कथन लोकांपुढे करू नका.

आपल्या अडचणीच्या काळात आपल्या दुःखाने दुःखी होणारे फार कमी लोक असतात. बाकीचे लोक आपली फजिती बघत असतात. त्यांच्यासमोर दुःखाचा बाजार मांडू नका. ते सहानुभूती दर्शवतील परंतु मनातून त्यांना आनंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घरच्या गोष्टी घरात राहायला हव्यात असे आपल्या पूर्वजांचेही सांगणे असे. तिसऱ्याच्या हस्तक्षेपामुळे घर दुभंगू शकते. शिवाय घरातल्या गोष्टी इतरांना कळल्या तर त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे लोक सभोवताली असतात. विशेषतः नवरा बायकोमध्ये मतभेद असतील तर त्यांनी घरातील वरिष्ठांची मदत घेऊन वाद मिटवावेत परंतु त्याबद्दल बाहेरच्यांशी चर्चा टाळावी.

प्रत्येकाच्या आयुष्यात अपमानाचे प्रसंग येतात. म्हणून कोणी श्रेष्ठ, कनिष्ठ ठरत नाही. यासाठी आपण किती सहन केले, अपमान पचवला याच्या लोकांसमोर बढाया मारायला जाऊ नका. लोक चांगलं ते घेणार नाहीच, शिवाय तुमच्या शब्दांचा विपर्यास करून पुन्हा अपमान करतील. ते टाळण्यासाठी मौन पाळा.

तुम्ही जे काम करता त्याबाबत गोपनीयता पाळायला शिका. आपले संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा. परंतु ते पूर्ण होण्याआधी इतरांना त्याबद्दल सांगून अडचणी वाढवून घेऊ नका. तुमचे संकल्प पूर्ण झाले की तुमच्या यशाची बातमी इतरांपर्यंत पोहोचू द्या. लढाई जिंकण्याआधीच यश साजरे करू नका. सावध राहा!