ऐतिहासिक किल्ले धारुर; विठोजीराजे आणि नेताजी पालकरांच्या वास्तव्याचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 05:38 PM2021-08-16T17:38:12+5:302021-08-16T17:51:06+5:30

मूळच्या धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर ( Historic Fort Dharur) नावाने आजच्या आधुनिक किल्ल्याची उभारणी झाली.

हा किल्ला 35 एक्कर क्षेञात उभारलेला असून फंदफितुरीने किश्वरखानाचा खून होऊन 1569 ला किल्ला अहमदनगरच्या निजामाकडे गेला. तेव्हा निजामाने किल्ले धारुरचे नामकरण " फत्तेहबाद" ठेवले. यावेळी छञपतींचे चुलत आजोबा विठोजीराजेंचे वास्तव्य काही काळ याठिकाणी राहिले.

पुढे 1630 ला फत्तेहबाद मोगलांच्या ताब्यात आला. औरंगजेबाच्या कालखंडात फत्तेहबाद हे जिल्ह्याचे ठिकाण होते. याच किल्ल्यात प्रती शिवाजी म्हणून ओळखले जाणारे स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकरांना अटक करण्यात आली होती.

1724 नंतर किल्ला हैद्राबादच्या निजामाकडे गेला. तेव्हा दुसरा निजाम निजामअली तसेच निजामाचे बीड व पुढे खर्ड्याचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर किल्ल्यात राहून गेलेले आहेत.

1948 च्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामातही किल्ल्याची महत्वपुर्ण भुमिका राहिले. स्वातंत्र्यानंतर फत्तेहबाद तालुक्याचे ठिकाण म्हणून बीड जिल्ह्यात समाविष्ट झाले. मोठ्या संघर्षानंतर शहराचे नामकरण धारुर झाले.

मोगलकाळात हा किल्ला टांकसाळ असल्याने पैशाची उलाढाल येथून व्हायची. सोबतच शुद्ध सोन्याची बाजारपेठ आणि साडी तसेच धोतरजोडीचे उत्पादन सर्वञ गाजलेले होते.

किल्ल्याची रचना पाहिल्यावर पूर्व बाजूला भुईकोट, पश्चिम व दक्षिण बाजूने दुर्गकोट तर उत्तर बाजूला जलकोट वाटणारी किल्ल्याची रचना आहे. यामुळे शञूला सहजासहजी किल्ल्यावर आक्रमण करता येत नव्हते.

किल्ल्याचे प्रवेशद्वार हे हत्तीला मागे पुढे करूनही उघडता न येण्याच्या रचनेचे असून मजबूत आहे. किल्ल्यात गोडापाण्याचा, खाऱ्या पाण्याचा साठा आहे. समोरील बाजूस सात बुरुज आहेत.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला एक शिलालेख असून. किल्ल्यात राजदरबार, राजाराणी महल, तेला तुपचे हौद, तोफा निर्मीती, दगडी तोफ गोळे निर्मितीची ठिकाणे आहेत..

याचबरोबर पूर्ण किल्ल्यात खपरी पाईपलाईन, पाण्याचे हौद जागो जागी आहेत, अशी उत्कृष्ट रचना किल्ल्याची आहे.

हा किल्ला 1998 च्या काळात संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येऊन पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेला. अलिकडे शासनाने किल्ल्याची फारच सुंदर डागडुजी केलेली आहे. तसेच शेगाव ते पंढरपूर हा चौपदरी महामार्ग पूर्ण होत आल्याने किल्ले धारुरला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा आहेत.