ब्युटी रुटीनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो बर्फ; त्वचेच्या या समस्या करतो चुटकीसरशी दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 01:03 PM2019-08-25T13:03:34+5:302019-08-25T13:10:44+5:30

बर्फाचा तुकडा फक्त थंड पेय पदार्थांमध्येच उपयोगी ठरत नाही तर बर्फाचा तुकडा त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर असतो. लोक आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात. असातच त्या उपायांचा काहींना फायदा होतो, तर काहींना अजिबात फायदा होत नाही. अशातच बर्फाचा तुकडा त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी ठरतो. जाणून घेऊया नक्की कोणत्या समस्या दूर करण्यासाठी बर्फाचा तुकडा आपल्या ब्युटी रूटिनमध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतं...

अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली सूज येते. झोप न होणं, अशक्त असणं यांसारखी अनेक कारणं असतात. पण अनेकदा डोळ्यांखाली आलेली ही सूज सौंदर्य बिघडवण्याचं काम करते. ही सूज दूर करण्यासाठी बर्फाचा तुकडा मदत करतो. त्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी एखाद्या मुलायम कपड्यामध्ये गुंडाळून डोळ्यांवर थोड्या वेळासाठी ठेवा. आराम मिळेल.

अनेक लोक पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी बर्फाच्या तुकड्याचा वापर करतात. त्यासाठी बर्फाचा तुकड्याने पिंपल्स आलेल्या जागेवर मसाज करा. असं केल्याने पिंपल्सवरील लालसरपणा कमी होतो आणि पिंपल्स दूर होण्यासही मदत होते.

कॉटनच्या कपड्यामध्ये काही बर्फाचे तुकडे गुंडाळून काही मिनिटांसाठी त्वचेवर मालिश करा. चेहऱ्यावर बर्फाच्या तुकड्याने मालिश केल्याने त्वचेची चमक वाढण्यास मदत होते. तसेच इतरही अनेक फायदे होतात.

अनेकदा थ्रेडिंग केल्यानंतर तेथील त्वचेवर वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी बर्फ अत्यंत फायदेशीर ठरतो. थ्रेडिंग केल्यानंतर तेथील त्वचेवर बर्फाच्या तुकड्याने मालिश करा. वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच त्या त्वचेवरील लालसरपणाही कमी होतो.

अनेकदा उन्हामध्ये फिरल्यानंतर सनबर्नची समस्या होते. उन्हामुळे त्वचा भाजते आणि लाल चट्टे येतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाचा तुकडा मदत करतो.

चेहऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी बर्फाचा तुकडा फायदेशीर ठरतो. त्यासाठी चेहऱ्यावरील ओपन पोर्स असलेल्या भागामध्ये बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.