आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका 'या' गोष्टी; थकवा आणि त्वचेच्या समस्या होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:15 PM2019-09-18T12:15:05+5:302019-09-18T12:26:40+5:30

शरीर स्वच्छ करण्यासोबतच त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठीही दररोज अंघोळ करणं गरजेचं असतं. अनेकदा पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये आपण अंघोळीसाठी गरम पाणी घेतो. पण त्यामुळे त्वचेला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. कारण गरम पाणी आपल्या त्वचेतील सर्व तेल काढून टाकतं. यामुळे त्वचा पूर्णपणे ड्राय होते. जर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे बदल केले तर मग वातावरण कसंही असलं तरीही त्वचेसोबतच शरीरात होणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका होईल.

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, अंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही गोष्टी एकत्र करून त्यानंतर अंघोळ केली तर त्यामुळे तुमची अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी पाण्यामध्ये एकत्र करून अंघोळ केल्याने शरीराला फायदे होतात, त्याबाबत...

जेव्हा तुम्ही अंघोळ करण्यासाठी पाणी घेता. त्यावेळी बादलीमध्ये एक चमचा सैंधव मीठ आणि फिटकरी एकत्र करा. त्यानंतर या पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. परिणामी शरीराचा थकवा, स्नायूंच्या वेदना दूर होतात.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा ड्राय होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ग्रीन टीच्या 4 ते 5 टी-बॅग एकत्र करा. 15 ते 20 मिनिटांपर्यंत पाण्यामध्ये तसचं राहू द्या. ग्रीन टी मध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंट आणि डिटॉक्सीफायर हे गुणधर्म अस्तित्वात असतात. जे त्वचेसाठी अॅन्टी-ऑक्सिडंट आणि क्लिंजर म्हणून काम करतात.

आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध एकत्र करून आंघोळ करा. त्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. तसेच यामध्ये असलेलं लेक्टिक अॅसिडचे गुण नॅचरल एक्सफॉलिएटप्रमाणे काम करतात. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतात. ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार होते.

आंघोळीच्या पाण्यामध्ये चार ते पाच चमचे बेकिंग सोडा एकत्र करा. यांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकतं. याव्यतिरिक्त हे शरीराची जळजळ कमी करून मुलायम बनवतं. एवढचं नाहीतर पाणी, दारू, कॅफेन, निकोटिन आणि औषधांमुळे होणारा प्रभाव शरीरातून डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो. तुम्ही त्यासोबत लिंबूही एकत्र करू शकता.

एक बादली कोमट पाण्यामध्ये दोन संत्र्यांच्या साली एकत्र करा. जवळपसा 10 मिनिटांनी हे साली काढून पाण्याने आंघोळ करा. संत्र्याच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराच्या वेदना आणि त्वचेवर होणारं इन्फेक्शन दूर करण्यासही मदत होते.

कडुलिंबाची 8 ते 10 पानं एक ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून घ्या. त्यानंतर एक बादली पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं एकत्र करा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. असं केल्याने त्वचेवर होणारं इन्फेक्शन आणी सूज दूर होण्यास मदत होते.

एकत बादली अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 कापराचे तुकडे एकत्र करा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. त्यामुळे डोकेदुखी आणि अंगदुखीची समस्या दूर होईल. त्यामुळे शरीराला आराम मिळेल.

आंघोळीच्या पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे गुलाब पाणी एकत्र करून त्या पाण्याने आंघोळ करा. त्वचेसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच शरीराचा दुर्गंध दूर होतो आणि स्नायूंना आराम मिळतो.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)