मर्सिडीजच्या 'या' कारची ११०० काेटींना विक्री, मोडले होते सर्व विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 11:16 AM2022-10-17T11:16:14+5:302022-10-17T11:23:36+5:30

मर्सिडीज-बेन्झ ३०० एलएलआर उलेनहाॅट कूप ही गाडी या किमतीला विकली गेली हाेती. या गाडीने कारविक्रीचे सर्व रेकाॅर्ड माेडले हाेते. ही एक टाॅप परफाॅर्मर रेसिंग कार हाेती.

आलिशान आणि महागड्या गाड्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. एखादी लग्झरी कार बाजूने गेली की नजर तिच्याकडे वळतेच. या गाड्यांची किंमत काेट्यवधी रुपये असते. साहजिकच एक प्रश्न येताे की, जगातील सर्वात महागडी कार काेणती असावी? याचे उत्तर वाचून तुमचे डाेळे फिरतील. जगातील सर्वात महागडी गाडी १०-१२ काेटी रुपयांना विकली गेली असावी, असे तुम्हाला वाटेल. पण, तब्बल १ हजार १०९ काेटी रुपयांना जगातील सर्वात महागडी कार विकली गेली हाेती. हाेय, हे खरे आहे.

कशी झाली हाेती विक्री? या गाडीची विक्री गुप्त लिलावाद्वारे झाली हाेती. याबाबत पूर्णपणे गाेपनीयता बाळगण्यात आली हाेती. मूळची जर्मनची कार विक्रेता मर्सिडीज ही कंपनी या विक्रीबाबत चर्चेपासून दूर राहू इच्छित हाेती. त्यामुळे कंपनीच्या एका संग्रहालयात गाडीची गुप्तपणे लिलावात विक्री झाली हाेती.

म्हणून उत्पादन केले बंद - ११ जून १९५५ राेजी ली-मान्स शर्यतीत एक भीषण अपघात झाला. त्यात चालक पिएरे लेवेघ याच्यासह ८३ प्रेक्षकांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे कंपनीने कारचे उत्पादन बंद केले.

आता प्रश्न पडला असेल की एवढी महागडी कार काेणी विकत घेतली? तर याबाबतही माहिती उघड झाली नाही. प्राप्त माहितीनुसार या व्यक्तीने स्वत:ची ओळख गुप्त ठेवली हाेती. प्रसिद्ध कारतज्ज्ञ किडस्टन एसए या कंपनीचे प्रमुख सायमन किडस्टन यांना त्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठविले हाेते.

यापूर्वी १९६३ मध्ये निर्मित फेरारी २५० जीटीओ या कारची ७० दशलक्ष डाॅलर्स एवढ्या किंमतीत एका लिलावात विक्री झाली हाेती. मर्सिडिज-बेंझ ३०० एसएलआर उलेनहाॅट कूप या गाडीपाठाेपाठ फेरारीची ४१० स्पाेर्ट स्पायडर या गाडीचा २ काेटी २० लाख डाॅलर्स एवढ्या किंमतीत लिलाव झाला.

ही आहेत जगातील सर्वात महागड्या कारची वैशिष्ट्ये. मर्सिडिज-बेन्झ ३०० एलएलआर ही एक रेसिंग कार आहे. तिचे १९५० मध्ये उत्पादन करण्यात आले हाेते. मात्र, केवळ दाेनच कार कंपनीने बनविल्या आणि १९५५ मध्ये उत्पादन बंद केले. १९५४ मध्ये १२ पैकी ९ शर्यती या गाडीने जिंकवून दिल्या हाेत्या. जगभरात केवळ दाेनच माॅडेल असल्यामुळे ही रेसिंग कार खूप खास हाेती. म्हणूनच रेकाॅर्डब्रेक बाेली लागली.