TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:00 PM2021-09-19T13:00:02+5:302021-09-19T13:04:30+5:30

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या Bajaj ला धोबीपछाड देत TVS ने धमाका केला आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव आताच्या सार्वकालिक उच्चांकावर आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच आता इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत चालली आहे.

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये TATA चा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये अनेकविध कंपन्या उतरल्या असून, यात आघाडीवर असलेल्या Bajaj ला धोबीपछाड देत TVS ने धमाका केला आहे.

टू-व्हीलस सेगमेंटमध्ये Electric Scooters ची विक्रीही वाढली आहे. ऑगस्ट २०२१ मधील रिपोर्टनुसार या सेगमेंटमध्ये TVS iQube Electric ने Bajaj Chetak Electric वर मात केली आहे.

ऑगस्टमध्ये TVS iQube Electric स्कूटरने विक्रीच्या बाबतीत Bajaj Chetak Electric ला मागे टाकले आहे. सध्या या दोन्ही भारतातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी आहेत.

ऑगस्ट २०२१ मधील TVS iQube च्या विक्रीच्या आकडेवारीची गेल्या वर्षीच्या ऑगस्ट २०२० शी तुलना केल्यास तब्बल २ हजार ७२१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण ६४९ टीव्हीएस आयक्यूब स्कूटर विकल्या.

TVS iQube ने जुलै २०२१ च्या तुलनेतही विक्रीमध्ये २० टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, Bajaj Chetak Electric ने ऑगस्ट २०२१ मध्ये भारताच्या बाजारात एकूण ३६४ चेतक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या.

Bajaj कंपनीच्या मंथली ग्रोथमध्ये ५० टक्क्यांची घट झाली, कारण कंपनीने जुलै २०२१ मध्ये भारतात एकूण ७३० चेतक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या. तर, वार्षिक ग्रोथमध्ये ९० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

या वर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत भारताच्या बाजारात एकूण २ हजार ९०४ TVS iQube स्कूटरची आणि एकूण २ हजार ३५५ Bajaj Chetak स्कूटरची विक्री झाली आहे. Bajaj Chetak ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये ९५ किलोमीटरपर्यंत रेंज देते.

Bajaj Chetak ४०८०W, BLDC मोटर आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिकला घरातल्या स्टॅंडर्ड ५-१५ amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणे शक्य आहे. एका तासात २५ टक्के आणि पाच तासात फुल चार्ज होते. ही स्कूटर ६ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून टॉप स्पीड ७० kmph आहे.

दुसरीकडे, TVS iQube ही इलेक्ट्रिक स्कूटर एकाच रंगाच्या पर्यायात उपलब्ध असून सिंगल चार्जमध्ये ७५ किलोमीटरपर्यंत रेंज देते. टीव्हीएस आयक्यूबमध्ये ४.४ किलोवॅट BLDC मोटर आहे. ही स्कूटर शून्य ते ४० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी ४.२ सेकंद घेते. स्कूटरचा टॉप स्पीड ७८ किलोमीटर प्रति तास आहे. तर, बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ५ ते ६ तासांचा वेळ लागतो.