शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 8:49 PM

1 / 9
अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात केल्याने देशवासीयांना काहीसा दिलासा मिळालेला असला, तरी अजूनही इंधनाचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत.
2 / 9
इंधनदरवाढीमुळे देशातील ग्राहक आता इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरकडे अधिक वळलेले पाहायला मिळत आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली वाहने इलेक्ट्रिक प्रकारात सादर करणार आहेत.
3 / 9
यातच आता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील, असा दावा गडकरी यांनी केला आहे. सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
4 / 9
इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी फक्त ५ टक्के आहे, तर पेट्रोल वाहनांवर तो जवळपास ४८ टक्के आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम बॅटरीची सर्वाधिक किंमत असते. ती लवकरच कमी करण्याचा प्रयत्न करू. असे झाल्यास किंमती खूप कमी होतील आणि पेट्रोल वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनेही उपलब्ध होतील, असे गडकरी म्हणाले.
5 / 9
लिथियम बॅटरीच्या एकूण गरजेपैकी ८१ टक्के बॅटरीचे उत्पादन स्थानिक पातळीवर केले जात आहे. त्याच्या पर्यायावरही संशोधन सुरू असून लवकरच या दिशेने काही सुधारणा दिसून येईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
6 / 9
भारत हा इलेक्ट्रिक वाहनांचे हब व्हावे, हे माझे स्वप्न आहे. म्हणूनच मी मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूला आमंत्रित केले आहे. दुचाकींच्या बाबतीत आम्ही आघाडी घेतली आहे. बजाज आणि हिरो सारख्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी निर्यात देखील करत आहेत, असे गडकरी म्हणाले.
7 / 9
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंटच्या कमतरतेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत त्यांची संख्या देशभरात वाढवली जाईल. सध्या रस्त्याच्या कडेला आणि बाजारपेठ परिसरात ३५० ठिकाणी चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
8 / 9
देशात इलेक्ट्रिक वाहन उद्योग झपाट्याने वाढत असून आगामी काळात किंमती कमी झाल्यानंतर त्यांचा वापर वाढेल. २०३० पर्यंत ३० टक्के खासगी गाड्या, ७० टक्के व्यावसायिक गाड्या आणि ४० टक्के बसेस इलेक्ट्रिक असाव्यात, असे आमचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
9 / 9
दरम्यान, आताच्या घडीला TATA मोटर्स इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आघाडीवर असून, इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये TVS ने बाजी मारली आहे.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारFuel Hikeइंधन दरवाढ