नवी कार घ्यायची की जुनी कार? जाणून घ्या फायदे तोटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 13:56 IST2019-10-22T12:53:43+5:302019-10-22T13:56:56+5:30

सध्या भारतात उत्सव काळ सुरू आहे. या काळात नवीन घर, वाहन खरेदी केली जाते. बाजार सुस्त असल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या विक्रीवरही झालेला आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात असाल आणि बजेट कमी असेल तर जुनी वापरलेली कारही फायदेशीर ठरू शकते. यातून पैसेही वाचतात आणि टेन्शनही. चला तर मग जाणून घेऊयात नुकसान आणि फायदे.
भारतात सेकंड हँड कार विक्रीही जोरात होते. काही कार कंपन्याही यामध्ये उतरलेल्या आहेत. विविध भागात खासगी एजंटही असतात. मात्र, सेकंड हँड कार घेताना काही गोष्टी विचारात न घेतल्यास नुकसानीचेही ठरू शकते.
किंमत
नव्या कारच्या निम्म्या किंमतीत तुम्हाला हव्या असलेल्या मॉडेलची जुनी कार मिळू शकते. या वाहनाचा मालक कार कशी वापरतो, मेन्टेनन्स वेळेवर करतो का, कारची स्थिती, अपघात झालाय का अशा गोष्टी पाहून कार निवडल्यास उत्तम असते. शिवाय कर्जाचा हप्ताही कमी असतो.
डेंट किंवा घासण्याचा तणाव नाही
जर तुम्ही पहिली कार घेत असाल आणि चालविता येत नसेल किंवा अनुभव नसेल तर नव्या कारऐवजी जुनी कार घ्यावी. जुनी कार चालवत असताना छोटी मोठी ठोकर किंवा घासण्यामुळे एवढा मोठा तोटा होत नाही. यामुळे तुम्ही आरामात वाहन चालवायला शिकू शकता. यानंतर तुम्ही नव्या कारचा विचार करू शकता.
विमा
नवीन कार घेतल्यानंतर त्याची विमा रक्कमही मोठी असते. तर जुनी कार घेतल्यास विम्याची रक्कमही कमी होत जाते. यामध्ये पैसेही वाचतात.
कर्जाचे ओझे कमी
नवीन कारवर जास्त कर्ज काढावे लागते. तर जुन्या कारवर तुमच्याकडे डाऊन पेमेंट असेल तेवढेच भरून कमी रक्कमेसाठी कर्ज घेऊ शकता.
रिसेल व्हॅल्यू
नव्या कारच्या तुलनेत जुन्या कारची रिसेल व्हॅल्यू जास्त आहे. नव्या कारची किंमत झपाट्याने कमी होते.
मेन्टेनन्सचा खर्च अधिक
नवीन कार 4 ते 5 वर्षे मेन्टेनन्स कमी देते शिवाय वॉरंटीही असते. मात्र, जुनी कार आधीच जास्त चाललेली असल्याने स्पेअर पार्ट झिजलेले असतात. यामुळे त्यावर जास्त खर्च करावा लागतो.
कमी मायलेज
नव्या कारच्या तुलनेत जुन्या कारचे इंजिन जास्त चाललेले असते. यामुळे कमी मायलेज मिळते.
वॉरंटी
जुन्या कारला फारशी वॉरंटी नसते. जुनी कार मुख्यता तीन किंवा 4 वर्षे वापरून विकली जाते. यामुळे वॉरंटी संपते. हे एक नुकसान असू शकते.