Maruti देणार TATAला टक्कर, लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक SUV; किंमत अवघी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:39 IST2022-08-08T14:34:25+5:302022-08-08T14:39:11+5:30
भारतातील इलेक्ट्रिक व्हिकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. आता टाटाला टक्कर देण्यासाठी मारुती स्वस्त इलेक्ट्रीक कार बाजारात लॉन्च करणार आहे.

Electric Vehicle: भारतातील इलेक्ट्रिक व्हिकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. पण, आता टाटाला कडवी टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती लवकरच आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहे.

मारुती सुझुकी 2024-25 पासून सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या गुजरात कारखान्यात इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन सुरू करेल. कंपनीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.

एका रिपोर्टनुसार, इतर कंपन्यांना कडवी टक्कर देण्यासाठी मारुती आपल्या वाहनाची किंमत कमी ठेवणार आहे. याशिवाय, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मारुतीने खरखोडा आणि हरियाणा येथे नवीन कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

मारुती या कारखान्यांसाठी पहिल्या टप्प्यात 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. विशेष म्हणजे, सध्या सीएनजी आणि प्रवासी विभागात मारुतीचे वर्चस्व आहे. पण आता मारुती इलेक्ट्रिक वाहन आणण्याच्या तयारीत आहे. ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

मारुतीची ही एसयूव्ही सुझुकी-टोयोटा यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. रिपोर्टनुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2024 च्या पहिल्या काही महिन्यात बाजारात येईल.

मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारच्या ड्राइव्हट्रेन पर्यायांसह येईल. 2WD प्रकारात 48kWh बॅटरी पॅक आणि 138bhp मोटर मिळू शकते. सुमारे 400 किमीची रेंज अपेक्षित आहे.

4WD प्रकारात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि एक मोठा 59kWh बॅटरी पॅक असेल. त्याची रेंज सुमारे 500 किमी असू शकते. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV ची किंमत 13 लाख ते 15 लाख रुपये ठेवणार आहे.

















