मारुती eVitara Bass सबस्क्रीप्शन, ३.९९ रुपये प्रति किमी परवडेल का? त्यापेक्षा बॅटरीसह घेतली तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:25 IST2026-02-18T15:17:19+5:302026-02-18T15:25:16+5:30
Maruti eVitara BaaS Model Benefits, loss : मारुती eVitara मधील 'BaaS' मॉडेल खरोखरच स्वस्त आहे का? बॅटरी सबस्क्रिप्शनचे गणित आणि व्याजाचा फटका; खरेदी करण्यापूर्वी हे सविस्तर विश्लेषण नक्की वाचा.

मारुती सुझुकीने आपली पहिली ईलेक्ट्रीक कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही कार लाँच करताना कंपनीने बॅटरीशिवाय म्हणजेच बॅटरी भाड्याने घेण्याची स्कीम लाँच केली आहे. यानुसार या कारची किंमत १०.९९ लाख रुपये एक्सशोरुम म्हणजेच पुण्या-मुंबईत ती साधारण १२ लाखांच्या आसपास मिळणार आहे. अशातच कंपनीने प्रति किमीसाठी ३.९९ रुपये भाडे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अर्थात ग्राहकांना बॅटरीसह कार विकत घेण्याचा देखील पर्याय आहे. परंतू, या दोन्ही पैकी कोणता प्रकार फायद्याचा ठरेल याबाबत लोक संभ्रमात आहेत.

किंमत कमी दिसण्यामागे मुख्य कारण आहे 'BaaS' (बॅटरी-एज-ए-सर्व्हिस) मॉडेल आहे. यामुळे लोकांचे लक्ष या डीलकडे वेधले जात आहे. या मॉडेलमध्ये तुम्ही गाडी खरेदी करताना बॅटरीची किंमत देत नाही, ती तुम्हाला भाड्याने मिळते. ही योजना खरोखरच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे का, की हे केवळ व्याजाचे जाळे आहे? हे पाहुयात.

तुम्हाला वाटत असेल की जर व्हिटाराचे BaaS वाले डेल्टा व्हेरिअंट १२ लाखांना मिळत असेल तर तेच परवडेल, पण तसे नाही. तुम्हाला याचा हिशेब मांडावा लागणार आहे. कंपनीने अद्याप डेल्टा व्हेरिअंटची बॅटरीसह किंमत जाहीर केलेली नाही. ती १६-१७ लाखांवर असणार आहे. म्हणजेच वरचे पाच लाख जरी धरले तरी तुम्हाला त्यावरील कर्जाचे व्याज आणि प्रति किमी ३.९९ रुपयांप्रमाणे किती होतात त्याची तुलना करणे गरजेचे आहे.

प्रति किमीने मोजणार असलात तरी तुम्हाला कमीतकमी किमीचे पैसे तर द्यावेच लागणार आहेत, मग तुम्ही तेवढी कार चालविली असो किंवा नसो. ती रक्कम किती असेल ते थोड्याच दिवसांत समोर येणार आहे. शिवाय तुम्हाला पहिल्या वर्षी १००० युनिट एवढीच फ्री चार्जिंगची स्कीम मारुतीने दिलेली आहे. म्हणजेच प्रति किमी चार्ज आणि चार्जिंगचेही पैसे तुम्हालाच तुमच्या खिशातून भरावे लागणार आहेत.

जर तुम्ही दिवसाला १०० किमी कार चालविणार असाल तर तुम्हाला दिवसाचे 399 रुपये आणि त्यावर जीएसटी आदी रक्कम भरावी लागणार आहे. महिन्याला समजा तुम्ही ३००० किमी कार चालविली तर जवळपास १२००० रुपये तुम्हाला मारुतीला बॅटरीचे भाडे म्हणून द्यावे लागणार आहेत.

समजा तुमचे दिवसाचे रनिंग ५० किमी असेल तर तुम्हाला २०० रुपये भाडे, ३० किमी असेल तर १२० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. परंतू, BaaS चे हे वरवरचे रुप दिसत असले तरी देखील त्यात कठोर अटी असतात. यामध्ये कमीतकमी किती रुपयांचे सबस्क्रीप्शन आहे, याचाही विचार करावा लागणार आहे.

बॅटरीसह घेतली तर काय...
जर बॅटरीसह कार घेण्याचा विचार केला तर तुम्हाला वर म्हटल्याप्रमाणे ५ लाख रुपयांचे व्याज आणि चार्जिंगला लागणारी वीज यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. समजा ५ लाखांचे ५ वर्षांसाठी ८.९० टक्के व्याजाने वाहन कर्ज घेतले तर तुम्हाला 10,355 एवढा ईएमआय जाणार आहे. शिवाय चार्जिंगचा खर्च पाहिला तर हा सर्व खर्च रनिंगनुसार बासपेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे.

बॅटरी एक किलोवॅट चार्ज होण्यासाठी १ युनिट लागतो, म्हणजेच डेल्टाच्या ४९ वॅटच्या बॅटरीला ४९ युनिट लागणार आहेत. १० रुपयाने तुमच्या घरची वीज पकडली तरी तुम्हाला यासाठी 499 रुपयांचा खर्च येणार आहे. १२ रुपयांनी युनिट पकडले तरी 588 रुपयांचा खर्च येणार आहे. कंपनीने ४४० किमी रेंजचा दावा केला आहे. कारने ३६०-३८० जरी रेंज दिली तरी देखील तुम्हाला तुमचे महिन्याचे रनिंग किती होईल याचा अंदाज घ्यावा लागणार आहे.

या कंडिशनमध्ये समजा तुम्ही महिन्याला ३००० किमी गाडी चालविणार असाल तर तुम्हाला साधारण ९ वेळा बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. म्हणजेच महिन्याचा बॅटरी चार्जिंगचा खर्च हा १० रुपये प्रति युनिटने पकडला तर ४४९१ रुपये येणार आहे. चार्जिंगचा एवढाच खर्च तुम्हाला BaaS मॉडेमध्येही येणार आहे.

दोन्हीचे आहेत फायदे तोटे...
या दोन्ही पर्यायांचे फायदे तोटे आहेत. बासचा विचार केला तर तुम्हाला कमीतकमी सबस्क्रीप्शन द्यावेच लागणार आहे. तसेच फायदा म्हणजे बॅटरीची मेन्टेनन्स, वॉरंटीसह सर्व जबाबदारी ही कंपनीची असणार आहे. कंपनी कारवर ८ वर्षांची वॉरंटी देत आहे. ती तुम्हाला बॅटरीसह घेत असलेल्या कारवर मिळणार आहे. म्हणजेच जर ८ वर्षांनी जर काही झालेच तर तुम्हाला खिशातूनच खर्च करावा लागणार आहे. शिवाय तुम्हाला कमीतकमी कार चालविण्याची अट नसणार. एकंदरीतच मारुती ई व्हिटारा घेताना तुम्हाला यातील अटी शर्थी आणि हिशेब यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

















