येलदरी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक; योग्य नियोजन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:30 IST2021-04-23T18:29:41+5:302021-04-23T18:30:22+5:30
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे.

येलदरी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक; योग्य नियोजन गरजेचे
परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पात केवळ ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाच्या साठ्यातून उन्हाळी हंगामातील सिंचन आणि अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातीेल पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे. मागील वर्षी येलदरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, रब्बी आणि खरीप हंगामासाठी या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले. त्यानंतर २२ एप्रिल रोजी या प्रकल्पात ५५०.३०० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ६८ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे, येत्या दोन-चार दिवसांत या प्रकल्पातील पाणी उन्हाळी हंगामासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे आणखी पाणीसाठा घटण्याची शक्यता आहे.
येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० योजना चालवल्या जातात. या योजनांसाठीही येलदरी प्रकल्पातून पाणी द्यावे लागणार आहे. सध्या अनेक भागात भूजल पातळी कमी झाल्याने प्रकल्पाच्या पाण्यावरच या गावांची भिस्त आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
सिद्धेश्वर प्रकल्प कोरडाठाक
येलदरी धरणाच्या खालच्या बाजूला असलेला हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्प मात्र कोरडाठाक आहे. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवणक्षमता ५.३ टीएमसी आहे; परंतु प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठाच शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी येलदरी प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे येलदरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत.