रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:41 IST2021-01-29T17:40:40+5:302021-01-29T17:41:57+5:30
Accident News पाथरी तालुक्यातील कानसुर गावाजवळ घडली घटना

रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी
पाथरी : रॉंग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकला उडवल्याची घटना गुरुवारी ( दि. २८ ) सायंकाळी तालुक्यातील कानसुर गावाजवळ सहा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर त्याची मेहुणी गंभीर जखमी झाली. अंकुश घागरमाळे ( २७ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील कानसुर वस्तीवरील अंकुश घागरमाळे याची मेहुणी सायली सोनपेठ येथील शाळेत आहे. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सायली बसने गावकडे येत होती. मात्र, डाकूपिंप्री येथे बस बंद पडली. यामुळे सायली डाकूपिंप्री येथे मैत्रिणीकडे थांबली. याची माहिती मिळाल्याने अंकुश घागरमाळे हे सायलीस गावाकडे आणण्यासाठी दुचाकीवर गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास अंकुश हे सायलीला घेऊन परत निघाले. दरम्यान, कानसुर गावाजवळ बाभळगावकडून रॉंग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात अंकुश घागरमाळेचा जागीच मृत्यू झाला, तर सायली गंभीर जखमी झाली. ललिता अंकुश घागरमाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.