२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:54+5:302021-09-14T04:21:54+5:30
परभणी : २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जंतनाशक गोळ्या घेणे ...

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
परभणी : २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जंतनाशक गोळ्या घेणे बंधनकारक आहे. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या गोळ्यांचे अद्याप वाटप झाले नसून, २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी ही मोहीम राबविली जाणार आहे.
बालकांमध्ये जंतदोष होण्याचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी जंतनाशक गोळ्या घेणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये अस्वच्छता तसेच खाद्यपदार्थांतून होणाऱ्या इन्फेक्शनमुळे पोटात जंत होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुलांना या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
काय आहे जंतदोष
अस्वच्छता आणि विविध प्रकारच्या इन्फेक्शनमुळे पोटात जंत होतात. त्यामुळे भूक न लागणे, कुपोषण, रक्तक्षय यासारखे आजार जडतात. जंतदोषामुळे मुलांचे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे या मुलांना जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
जंतदोष होऊ नये यासाठी वयाच्या १९ वर्षांपर्यंत जंतनाशक गोळ्या द्याव्या लागतात. १ ते २ वर्षांपर्यंतच्या बालकांना अर्धी गोळी आणि २ वर्षांपुढील मुलांना १ गोळी पाण्यात विरघळून दिली जाते.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये या गोळ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय, मनपाचे आरोग्य केंद्र, ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात या गोळ्या उपलब्ध असतील.
२१ सप्टेंबर रोजी मोहीम
२१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे, तसेच या मोहिमेत वंचित राहिलेल्या बालकांसाठी २८ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.