सार्वजनिक विहिरींची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:29+5:302021-04-06T04:16:29+5:30
रस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात मिळेना गती परभणी : जिल्ह्यात रस्त्यांची कामे वेगाने होत नसल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत ...

सार्वजनिक विहिरींची कामे रखडली
रस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात मिळेना गती
परभणी : जिल्ह्यात रस्त्यांची कामे वेगाने होत नसल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. वसमत, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या चारही रस्त्यांवर रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. मात्र, मागच्या दोन वर्षांपाूसन ही कामे पूर्ण होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या कामांमुळे किरकोळ अपघातही होत आहेत. तेव्हा रस्त्याच्या कामांना गती द्यावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
कोरोनाच्या संकटाने विकासकामांना ब्रेक
परभणी : दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट वाढत असल्याने जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. काही कामांसाठी निधी उपलब्ध नाही तर काही कामे निधी उपलब्ध असतानाही सुरू केली नाहीत. त्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याविषयी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहात आहेत. राज्य शासनाने विकासकामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानकावर दादऱ्याचे काम संथगतीने
परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात दादऱ्याचे काम संथगतीने सुरू असून, दीड वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नाही. परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता, अधिक रुंदीचा दादरा या ठिकाणी उभारण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या मर्यादित स्वरुपाची आहे. तेव्हा पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी
परभणी : शहरातील बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. प्रत्येक महिन्यात १ ते १० तारखेदरम्यान बँकांच्या परिसरात मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आणि गोरगरीब नागरिकच या ठिकाणी रांगा लावून बँकेचे व्यवहार करतात. या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा बँक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
दुभाजकावरील झाडे वाळू लागली
परभणी : शहरातील जिंतूर रोड आणि वसमत रस्त्यावरील दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. वाढलेल्या उन्हामुळे ही झाडे जळू लागली आहेत. झाडांना पाणी कमी पडत असून, कोवळी झाडे जळत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन झाडांना टँकरद्वारे पाणी द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.