करणीच्या संशयातून दगडाने हल्ला करून महिलेचे कपाळ फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:18 IST2019-07-03T19:16:08+5:302019-07-03T19:18:38+5:30
महिला व त्यांच्या सुनेला जीवे मारण्याची दिली धमकी

करणीच्या संशयातून दगडाने हल्ला करून महिलेचे कपाळ फोडले
गंगाखेड (परभणी ) : करणी करून आम्हाला त्रास का देतेस आमच्या घरा समोरुन ये जा करू नको असे म्हणत दगडाने मारून कपाळ फोडल्याची घटना बुधवारी (दि.३ ) तालुक्यातील सुरळवाडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सुरळवाडी येथील जनाबाई रामदास जाधव ( ६० ) या बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सून बबिता प्रकाश जाधव हिच्या सोबत घरासमोर काम करत होत्या. यावेळी नामदेव धारबा जाधव व त्यांची भावजय गेनाबाई योगाजी जाधव यांनी,' तू आमच्यावर करणी करून आम्हाला त्रास का देत आहेस, तू आमच्या घरासमोरील रस्त्यावरून ये जा का करीत आहेस' असे विचारून शिवीगाळ केली. जनाबाई जाधव यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता नामदेव जाधव यांनी रस्त्यावरील दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचे डोके फुटले असून त्या जखमी झाल्या आहेत. बबिता जाधव या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी जनाबाई जाधव यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरुन दोघांविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार टी. टी. शिंदे, पोलीस शिपाई विष्णु वाघ हे करीत आहेत.