बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:50 IST2021-01-11T19:49:26+5:302021-01-11T19:50:28+5:30
याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
परभणी : शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात एका घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य घेऊन येणाऱ्या ऑटोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सखूबाई नागोराव मोरे या राहतात. ७ जानेवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास शेजारी सुरेश अन्नदाते यांच्या घराच्या बाजूला बसल्या होत्या. अन्नदाते यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने एमएच २२ एन २७९४ क्रमांकाचा मालवाहू ऑटो बांधकामाचे साहित्य घेऊन आला. यावेळी या ऑटोने सखूबाई मोरे यांना जोराची धडक दिली. या अपघातात सखूबाई या गंभीर जखमी झाल्या.
उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ८ जानेवारी रोजी सखूबाई मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यााबाबत त्यांचा नातू सर्जेराव महादू सावंत यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निष्काळजीपणे वाहन चालवून महिलेच्या मृत्यप्रकरणी एमएच २२ एन २७९४ क्रमांकाच्या मालवाहू ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.