The winds of change began to blow; Unrest in the NCP over the working of the Guardian Minister Nawab Malik | बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

ठळक मुद्देशरद पवार यांच्याकडेच जिल्ह्यातील नेते मंडळींची तक्रारविश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही भेट दिली नाही.

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे  विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्रीपदी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी होईल, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच नियुक्तीनंतर त्यांच्या दौऱ्यात प्रारंभी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असायचा. कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील कामे मार्गी लागतील, अशी पक्षाच्या नेतेमंडळींची अपेक्षा होती; परंतु, मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे गेल्या दोन दौऱ्यांपासून सुरू केले होते.  विविध कामे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. एखाद्या कामाची शिफारस केल्यास त्याकडे लक्षच दिले जात नाही. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी जी निवेदने दिली. त्यापैकी बहुतांश निवेदनावर काहीही कारवाई झाली नाही. पक्षाचा पालकमंत्री असूनही कार्यकर्त्यांना अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींनी पालकमंत्री नवाब मलिक यांची तक्रार केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांना परभणी जिल्ह्यात रस नाही. त्यामुळे ते नियमित दौऱ्यावर येत नाहीत. कार्यकर्त्यांच्या निवेदनावर कार्यवाही करीत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे त्यांना बदलू अन्य कोणालाही ही जबाबदारी द्या, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.  त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजीच मलिक जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यात एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सहभागी झाला नाही. त्यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी समोर आली. 

पक्षाच्या बैठका विश्रामगृहात
पालकमंत्र्यांचे परभणी दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्य राहिले. या विश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही राष्ट्रवादी भवनला भेट दिली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही विश्रामगृहातच घेतली. पक्षाच्या जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समिती सदस्यांशी एकदाही त्यांनी संवाद साधला नाही. अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेतली नाही. मग, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीची कामे कशी करायची, असेही या पक्षातील नेत्यांनी वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडले.

Web Title: The winds of change began to blow; Unrest in the NCP over the working of the Guardian Minister Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.