जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला; रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वारासोबत हरीण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:58 IST2024-01-22T16:58:09+5:302024-01-22T16:58:50+5:30
या अपघातात हरीण जागीच ठार झाले तर गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला; रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वारासोबत हरीण ठार
पाथरी: रस्ता ओलांडणाऱ्या हरणासोबत दुचाकीस्वाराची जोरदार धडक होऊन अपघाताची घटना रविवारी ( दि.२१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुंज ते लोणी रस्त्यावर झाला. या अपघातात हरीण जागीच ठार झाले तर गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास गुलाब लुचारे असे मृताचे नाव आहे.
पाथरी तालुक्यातील गुंज येथील कैलास गुलाब लुचारे (40) हे रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुंज येथून बाभळगाव फाटा दिशेने दुचाकीवरून जात होते. दरम्यान गुंजपासून दिड किमी अंतरावर अचानक शेतातून बाहेर आलेल्या हरणास कैलास यांच्या दुचाकीची धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, हरण जागीच ठार झाले. तर कैलास लुचारे हे गंभीर जखमी झाले. काही वेळाने इतर वाहनधारकांनी जखमीस पाथरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान सोमवारी कैलास यांचा मृत्यू झाला.
जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला
या परिसरात हरीण, काळवीट आणि इतर जंगली प्राण्यांचे अनेक कळप शेतात फिरताना आढळून येतात. हे प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. तसेच हे प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने अनेक शेतकरी, प्रवासी जखमी झाले आहेत. तर काहींचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत.