विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:48 IST2025-05-08T18:47:59+5:302025-05-08T18:48:34+5:30
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना

विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू
बोरी (जि.परभणी) : विहिरीचे बांधकाम करताना विहिरीवरील माती अंगावर कोसळल्याने काम करणाऱ्या भागवत बाळू वडवले (वय २७, रा. कौसडी) या गवंड्याचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील भागवत बाळू वडवले हा एका शेतकऱ्याच्या विहिरीचे कडेचे बांधकाम करीत असताना अचानक विहिरीच्या वरचा भाग अंगावर कोसळल्याने तो विहिरीत पडला. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. त्यास तत्काळ दवाखान्यात दाखल केल्यानंतर परभणीत उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि. सुनील गोपीनवार, अनिल शिंदे, कोकाटे यांनी परभणी येथील दवाखान्यात भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी बोरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे कौसडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.