बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:09+5:302021-05-25T04:20:09+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द ...

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत अद्याप स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी संभ्रमात असताना दुसरीकडे पालकही राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराज आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांची ऑफलाईन परीक्षा या काळात घेणे अनेक शिक्षणतज्ज्ञांना धोक्याचे वाटते. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे तर महत्त्वाचे आहे; परंतु त्यासाठी काय पर्याय आहेत, याची पडताळणी सध्या शासनपातळीवर सुरू आहे. यातून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी पुढे येत आहे; परंतु यासाठीची उपलब्ध साधनसामग्री अपुरी असणे, ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत येणारे अडथळे आदी कारणांमुळे ऑनलाईन परीक्षेची बाब अनेकांना योग्य वाटत नाही.
ठराविक कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेऊन, त्यांचे महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन करून महाविद्यालयांमधून परीक्षा मंडळाला गुण पाठवणे, हा पर्याय होऊ शकतो. कारण विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ‘नीट’सारख्या परीक्षांसाठी विशिष्ट पात्रतेची अट असते, सरसकट विद्यार्थी फक्त उत्तीर्ण केल्यास त्यांना या परीक्षा देता येणार नाहीत.
- प्रा. आरती बोबडे, शिक्षणतज्ज्ञ
सध्याच्या अडचणीच्या काळात गुणवत्तेपेक्षा विद्यार्थ्यांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणेच योग्य राहणार आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांनाच अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाला सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.
- प्रा. सुनील तुरूकमाने, शिक्षणतज्ज्ञ
विद्यार्थांची एक तासाची बहुपर्यायी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना गुणदान करता येईल. त्यामुळे विद्यार्थांचे योग्य गुणदान होऊन विद्यार्थांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण व महत्त्वाच्या विषयाचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन याच्याआधारे विद्यार्थ्यांना गुणदान करता येईल.
- प्रा. गोविंद धोंडगे, शिक्षक
बारावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेला कोणताही अन्य पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने यासाठी आणखी काही पर्याय आहेत का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द करणे ही अत्यंत चुकीची बाब असणार आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घ्याव्यात.
- राधिका कडतन, विद्यार्थीनीतज्ज्ञ
विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा होणे महत्त्वाचे आहे. बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच भविष्यातील शिक्षण आणि नोकरीच्या अनेक संधी अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा विचार करू नये. उलट या परीक्षा ऑनलाईन घेतल्या पाहिजेत. यासाठीची साधनसामग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे.
- रोहित कटारे, विद्यार्थी
कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने बारावीतील विद्यार्थ्यांचे दहावी व अकरावीतील गुण विचारात घेऊन बारावीसाठी गुणदान करावे. याशिवाय सदरील विद्यार्थ्यांकडून यापूर्वीच्या शैक्षणिक सत्रात सक्रिय सहभाग नोंदविला गेल्यास त्यांना बोनस गुण दिले पाहिजेत.
- निकिता रोकडे, विद्यार्थिनी