'मनपात नोकरी लावतो'; शिपाई, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने १७ जणांची केली फसवणूक,लाखो उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:02 IST2022-03-16T14:01:31+5:302022-03-16T14:02:33+5:30
परभणी महापालिकेत कारकून तसेच अन्य पदावर नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. या जागांसाठी नोकरी लावतो, आमच्या मंत्रालयात ओळखी आहेत, असे सांगून केली फसवणूक

'मनपात नोकरी लावतो'; शिपाई, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने १७ जणांची केली फसवणूक,लाखो उकळले
परभणी : महापालिकेत कारकून म्हणून नोकरीला लावतो, असे म्हणून जवळपास १७ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार २०१८ ते २०२२ च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी नवा नोंढा पोलीस ठाण्यात १५ मार्च रोजी रात्री उशिरा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीत महापालिकेत कार्यरत असणाऱ्या शिपायाचा व अन्य एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
परभणी महापालिकेत कारकून तसेच अन्य पदावर नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. या जागांसाठी नोकरी लावतो, आमच्या मंत्रालयात ओळखी आहेत, असे म्हणून महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी काशिनाथ जाधव व कार्यरत शिपाई दिगंबर कुलकर्णी यांनी अनेकांना खोटे बोलून त्यांची आर्थिक फसवणूक केली. पिंगळी रोडवरील खानापूर नगर भागात राहणाऱ्या संताबाई नरहरी भुजबळ यांनी दिगंबर कुलकर्णी, काशिनाथ जाधव यांना वैयक्तिक २ लाख ५० हजार रुपये नोकरी लावण्यासाठी दिले तसेच अन्य १७ जणांनी माहितीच्या आधारे या दोन जणांना एकूण ३६ लाख ५० हजार रुपये नोकरी लागण्यासाठी मागील चार वर्षाच्या कालावधीत दिले.
मात्र, पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याने तसेच याबाबत संशय वाढल्याने संताबाई भुजबळ यांनी दिगंबर कुलकर्णी, काशिनाथ जाधव यांच्याकडे पैशाच्याबाबत विचारणा केली. नोकरीचे काय झाले असाही तगादा लावला. त्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने अखेर संताबाई भुजबळ यांनी १५ मार्च रोजी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दिली. तसेच अन्य १७ जण फसवणूक झाल्याबाबत पोलिसांकडे माहिती देण्यासाठी आले होते. या सर्व प्रकारानंतर नवा मोंढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ मार्च रोजी घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे तपास करीत आहेत.
मनपा प्रशासनाला माहिती कळवू
सदरील प्रकरणात मनपाचा एक कर्मचारी सेवानिवृत्त तर आणि एक कर्मचारी सध्या शिपाई म्हणून मनपात कार्यरत आहे. कार्यरत कर्मचाऱ्याविषयीची माहिती मनपा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जाईल, अशी माहिती नवा मोंढ्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी दिली.