वेळा न ठरविताच होतोय पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:49+5:302021-09-14T04:21:49+5:30
परभणी : मनपाच्या वतीने नळाद्वारे अवेळी पाणीपुरवठा केला जात असून, अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. ठरलेल्या वेळाने ...

वेळा न ठरविताच होतोय पाणीपुरवठा
परभणी : मनपाच्या वतीने नळाद्वारे अवेळी पाणीपुरवठा केला जात असून, अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. ठरलेल्या वेळाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आता शहरातील सर्वच भागांत पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाणी वितरणाचे नियोजन अद्यापही योग्य पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे पाणी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला येईल, याचा नेम नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे. अनेक वेळा तर पाणी येऊन गेलेलेही अनेकांना लक्षात येत नाही. महापालिकेने पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन केलेले नाही. कोणत्या प्रभागात कधी पाणी सोडायचे, याचे नियोजन नसल्याने नागरिकांनाच पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक वेळा तर रात्री-अपरात्री नळांना पाणी सोडले जाते, त्यामुळे पाण्यासाठी रात्रही जागून काढावी लागते.
सध्या शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. शहरवासीयांसाठी मुबलक प्रमाणात पाणीही उपलब्ध आहे. असे असताना केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा मनपाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
आठ दिवसांतून एक वेळा पाणी
नवी योजना कार्यान्वित होण्यापूर्वी १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. मात्र, भर पावसाळ्यातही नागरिकांना आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची उपलब्धता असताना आणि नवीन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली असतानाही नागरिकांना मात्र पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.