परभणी-पूर्णेसाठी पाणी: भर उन्हाळ्यात दुधनाचे पात्र भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:58 IST2018-04-08T00:58:52+5:302018-04-08T00:58:52+5:30
जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे.

परभणी-पूर्णेसाठी पाणी: भर उन्हाळ्यात दुधनाचे पात्र भरले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे.
परभणी व पूर्णा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांना पूर्वी येलदरी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, गेल्या वर्षी येलदरी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या माध्यमातून या शहरांना पाणी दिले जात आहे. या अनुषंगाने १ एप्रिल रोजी निम्न दुधना प्रकल्पातून या दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ८ दलघमी पाणी १२०० क्युसेसने दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना नदीचे पात्र तुडूंब भरुन वाहू लागले आहे. हे पाणी दुधना नदीतून पूर्णा नदीत प्रवाही झाले असून ते परभणी- वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाऱ्यातही दोन दिवसांपूर्वीच पोहचले. तेथून ते पूर्णा शहराजवळ असलेल्या बंधाºयातही पोहोचले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना बरोबरच पूर्णा नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. शिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे.
नदीपात्रामध्ये केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याने या पाण्याचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
परभणी शहरात दहा दिवसांआड पाणी
परभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यानंतर ते राहटी बंधाºयात पोहोचले आहे; परंतु, महानगरपालिकेची पाणी वितरणाची ढिसाळ व्यवस्था असल्याने शहरवासियांना किमान दहा दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये मनपाचे पाणी वितरणाचे दिवस कमी होण्याऐवजी वाढत असल्याचेच दिसून येत आहे.