दगडाने ठेचून वेटरचा निर्घुण खून;उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 17:42 IST2022-03-01T17:41:11+5:302022-03-01T17:42:48+5:30
सकाळी साडेसातच्या सुमारास मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला

दगडाने ठेचून वेटरचा निर्घुण खून;उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला मृतदेह
सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका हाॅटेल वेटरचा मृतदेह १ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल रामदास सदाफळे ( ५०, रा.नशीबपुरा, ता.अचलपूर जि. अमरावती, हल्ली मुक्काम, विद्यानगर, सेलू) असे मयताचे नाव आहे. मयत विशाल सदाफळे हे परतूर तालुक्यातील सातोना शिवारातील दुधना धाब्यावर वेटर म्हणून कामाला होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विशाल यांचा मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ, सुधाकर चौरे व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
सहायक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मृताची बहीण पूजा रामदास सदाफळे यांनी फिर्याद दिली. यावरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड तपास करीत आहेत.