पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 18:58 IST2021-05-21T18:57:45+5:302021-05-21T18:58:16+5:30
एका दुचाकी चालकास लाथा व हाताने गालात चापटा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
जिंतूर ( परभणी ) : शहरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये दि 17 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता संचारबंदीच्या काळात एका दुचाकी चालकास पोलीस कर्मचारी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दुचाकी चालकाचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सुदामराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. 20 मे रोजी जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरात संचारबंदी सुरू असताना आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अर्जुन सुदामराव पवार हे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये कर्तव्य बजावत होते. त्यावेळी ते एका दुचाकी चालकास लाथा व हाताने गालात चापटा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत अर्जुन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आकोली रस्त्याने एक तरुण विना मास्क दुचाकी चालवत येत असल्याचे पोलिस कर्मचारी बिलाल यांना आढळून आले. त्यांनी त्यास मास्क नसल्याने दंड भरण्यासाठी पवार यांच्याकडे पाठवले. त्यावेळी दुचाकी चालक अमोल किशनराव मोरे ( रा. हिंगोली ) याने तो मित्रासह औरंगाबाद येथून हिंगोलीला जात आहेत. यावेळी त्याने दंड भरण्यास नकार देत पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी अमोल मोरे विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.