सावकारी जाचाचे बळी; मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे दोन तरुणांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 17:16 IST2021-09-01T17:16:13+5:302021-09-01T17:16:33+5:30
खाजगी सावकार व्याजाच्या पैशावरून सतत मारहाण करत असे.

सावकारी जाचाचे बळी; मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे दोन तरुणांची आत्महत्या
सोनपेठ ( परभणी ) : खाजगी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून शहरातील बालेपीर रस्त्यावर सोमवारी ( दि. 30 ) दोघा जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या उपचारादरम्यान आज मृत्यू झाला .
सोनपेठ शहरातील सोनखेड येथील बालेपीर रस्त्यावर 30 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सुनील पारवे व रितेश क्षीरसागर हे दोघेजण बेशुद्धावस्थेत पडले होते. याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी उपचार चालू असताना दोघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणी मीरा क्षिरसागर यांनी सोनपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुनील पारवे व रितेश क्षीरसागर यांना खाजगी सावकार व्याजाच्या पैशावरून मारहाण करत. सावकाराच्या जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मीरा क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून अजय घुगे, सुनील मुंडे, हनुमंत घुगे तिघे ( रा. सोनखेड ता. सोनपेठ व ऋषी रा. कवडगाव ता. परळी ) या आरोपींविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंचक फड हे करत आहेत.