खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्ह दिले असते तर झाला असता वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:08+5:302021-05-26T04:18:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : पीएम केअर योजनेतून जिल्ह्याला प्राप्त झालेेल्या व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स वापराअभावी पडून असल्याचे आढळले आले ...

खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्ह दिले असते तर झाला असता वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीएम केअर योजनेतून जिल्ह्याला प्राप्त झालेेल्या व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स वापराअभावी पडून असल्याचे आढळले आले आहे. त्यामुळे काही व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना दिले असते तर योजनेचा उद्देश सार्थकी लागला असता, अशी भावना निर्माण होत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी पीएम केअर फंडातून दोन टप्प्यात जिल्ह्याला ९५ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले. हे सर्व व्हेंटिलेटर्स शासकीय आरोग्य संस्थांनाच देण्यात आले. शनिवारी आ. सतीश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली तेव्हा १५ पैकी १४ व्हेंटिलेटर्स एका खोलीत मांडून ठेवल्याचे दिसून आले. हे व्हेंटिलेटर्स वापरात नसल्याचे दिसून आले. तसेच सेलू उपजिल्हा रुग्णालयातील चारही व्हेंटिलेटर्स तांत्रिक कारणांमुळे सुरू नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग काळात ज्या खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, त्या रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले असते तर केंद्र शासनाच्या व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची योजना सार्थकी लागली असती, असेच म्हणावे लागेल.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी होती धावपळ
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे; मात्र एप्रिल महिन्यात हा संसर्ग वाढलेला असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी मोठी धावपळ झाली होती.
ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने काही रुग्णांच्या नातेवाइकांना परजिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागत होते. परभणी शहरात काही खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत जावे लागत होते.
अशा काळात पीएम केअर योजनेतून मिळालेले काही व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना दिले असते तर त्यावेळी अनेक रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर्स उपयोगात आले असते. त्यामुळे जिल्ह्याला मिळालेल्या व्हेंटिलेटर्स वापरात येण्यासाठी काही खासगी रुग्णालयांनाही ते देणे आवश्यक होते, अशी भावना आता निर्माण झाली आहे.